नवी दिल्ली- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच असून त्याला भारतात परत आणणारच, असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. दाऊदच्या मुद्यावर उठलेल्या वादानंतर सोमवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवदेन सादर केले.
दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असून त्याच्या अटकेसंदर्भातील सर्व कागदपत्रे पाकिस्तान सरकारकडे पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे लवकरच त्याला अटक केले जाईल, असे आश्वासन पुन्हा एकदा राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिले.
12 मार्च 1993 रोजी मुंबईत 13 साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात अडीचशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा स्फोट दाऊदनेच घडवल्याचा आरोप आहे. या बॉम्ब स्फोट प्रकरणासह अन्य विविध गुन्ह्यांत तो भारताला हवा आहे. भारताने दाऊदला वाँटेड गुन्हेगार घोषित केले आहे. त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आले आहे. भारताने वेळोवेळी पाकिस्तानलाही याची माहिती दिली आहे. तरीही पाकिस्तान या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यास असमर्थ ठरला आहे. आम्ही त्यांच्यावर दबाव कायम ठेवला असून दाऊदला भारतात परत आणूच, अशा शब्दांत राजनाथ यांनी आपले निवेदन सादर केले.
याआधी पाच मे रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी लोकसभेत दाऊदचा ठावठिकाणाच माहित नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे भाजपा सरकारवर चौफेर टीका झाली. विरोधीपक्षांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर राजनाथ सिंह यांनी हे स्पष्टीकरण दिले.