मुंबई ः महिला बचत गटांसाठी शहरातील व राज्यातील विविध मॉलमधील जागा सवलतीच्या दरात देण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने हा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
आठवलेंच्या या मागणीला भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी आठवलेंच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे. ही योजना अत्यंत चांगली असून मॉल मालकांनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. बचत गट व स्वयंसेवी संस्थांना किफायतशीर दरात जागा मिळाल्यास त्यांना अधिक चांगल्या प्रकारे व्यवसाय करता येणे शक्य होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या बचत गटांना त्यांचा व्यवसाय मुख्य प्रवाहात येऊन करणे आवश्यक आहे, त्यासाठी त्यांना मॉल, मुख्य बाजारपेठ, आदी ठिकाणी जागा मिळणे आवश्यक आहे. शिवसेनेच्या वचननाम्यात या मागणीचा समावेश आहे. शिवसेना भवनाच्या इमारतीत बचत गटांसाठी एक गाळा देण्यात आला आहे. आठवलेंनी केलेली मागणी योग्य असून या मागणीची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा असताना आपण यासाठी प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली.