* स्थायी समिती सदस्यांना मनीऑर्डर केली जाणार
* लोकवर्गणीतून निधी संकलन केले जाणार
* या मुद्याद्वारे मनसे कमबँक जोरदार करणार
नवी मुंबई : – कुसुमाग्रजांच्या जन्म दिनी मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना संलग्नित जनविकास प्रबोधिनी व नवी मुंबई कला प्रबोधिनी या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दिनांक 27 फेब्रुवारी 2015 रोजी सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे प्रथमच 3 दिवसीय मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या मराठी चित्रपट महोत्सवास मनपा आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पालिकेच्या सामाजिक भावनेतून स्वतःच्या अधिकार क्षेत्रात 1 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्या प्रकरणी राष्ट्रवादी व शिवसेना स्थायी समिती सदस्यांनी स्थायी समिती बैठकीत विरोध केला आहे. यावर जनविकास प्रबोधिनीचे अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थायी समिती सदस्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
नवी मुंबईमध्ये प्रथमच अशा प्रकारे प्रदर्शित व अप्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांचा 3 दिवसीय महोत्सव घेण्यात आला होता. या महोत्सवास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, गायक शंकर महादेवन, दिग्दर्शक अभिजित पानसे, अभिनेते सयाजी शिंदे, अरुण नलावडे, संतोष जुवेकर, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, आदिनाथ कोठारे, जयवंत वाडकर, विजय कदम, संजय खापरे, अभिनेत्री उर्मिला कानेटकर, क्रांती रेडकर, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, स्वाती गवाणकर, स्वाती गोंदकर इत्यादी सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत उपस्थित होते. नवी मुंबईकरांना या सर्व सिनेकलाकारांसोबत दर्जेदार मराठी सिनेमे बघण्याची संधी चित्रदृष्टी मराठी चित्रपट महोत्सवाद्वारे उपलब्ध झाली होती. हा संपूर्ण चित्रपट महोत्सव सर्वसामान्यांना निःशुल्कपणे उपलब्ध होता. तसेच नवी मुंबईतील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही या उपक्रमास मोठ्या संख्येनी हजेरी लावली होती.
मात्र एका बाजूला राज्य सरकार मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देत असताना नवी मुंबई मनपातील स्थायी समिती सदस्यांनी या चित्रपट महोत्सवाला विरोध करून एक प्रकारे आपला मराठी द्वेषच दाखविला असल्याचा आरोप गजानन काळे यांनी केला आहे. या सर्व प्रकारात शिवसेनेच्या स्थायी सदस्यांनीही आपले मराठीवरील बेगडी प्रेम जाहीर केल्याचे गजानन काळे यांनी निषेध व्यक्त करताना म्हटले आहे. या स्थायी समिती सदस्यांना मराठी मतदारांनी मतदान केल्याचा विसर पडला की काय असा सवालही गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.
या सर्व प्रकाराचा व मराठी चित्रपटांचा व पर्यायाने मराठी भाषेचा द्वेष करणार्या स्थायी समिती सदस्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी, नवी मुंबईतील मराठी प्रेमी व सिनेरसिक प्रेक्षांकडून प्रत्येकी 1 रुपया गोळा करून या स्थायी समिती सदस्यांच्या नावाने प्रत्येकी रु.6,660/- रुपयांची मनी ऑर्डर करण्याचे अभिनव आंदोलन करणार असल्याचे गजानन काळे यांनी म्हटले आहे. तसेच या स्थायी समिती सदस्यांच्या वॉर्डात जाऊन चौका-चौकात सभा घेऊन या गोष्टीचा जाहीर निषेध करणार असल्याचाही मानस गजानन काळे यांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबईतील चित्रपट व नाट्यसृष्टीतील कलाकारांनी तसेच तंत्रज्ञ मंडळींनीही या कृतीचा निषेध करण्याचे आवाहन मनसेने केले आहे.
यावेळी या पत्रकार परिषदेला मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे उपस्थित होते.
पत्रकार परिषद संपताक्षणी गजानन काळे यांनी उपस्थित पत्रकारांकडूनच 1 रूपाया जमा करून या मोहीमेचा शुभारंभ केला आहे. सोमवार, दि. 15 जूनपासून ही मोहीम नवी मुंबईत सर्वत्र राबविली जाणार आहे. थंडावलेल्या मनसेला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिध्दीकरता नाहक कोलीत उपलब्ध करून दिले असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.