नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना देण्यात आलेल्या झेड प्लस सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे राजस्थान भाजपचे प्रवक्ते कैलाश नाथ भट यांनी गुरूवारी पदाचा राजीनामा दिला. सरसंघचालकांच्या सुरक्षेबद्दल टिप्पणी करणे त्यांना महागात पडल्याचे बोलले जात आहे.
भट यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी यांना राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. सरसंघचालकांबद्दल मी केलेल्या वक्तव्यामुळं अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या भावनांची दखल घेऊन संघटनेच्या हिताखातर मी पदावरून दूर होत आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं सरसंघचालकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयावर भट यांनी सोशल साइटवर परखड भाष्य केले होते. सरसंघचालकांना झेड प्लस सुरक्षा का दिली जात आहे हे मला माहीत नाही आणि त्यांनी ती स्वीकारली आहे का हेही माहीत नाही. पण, मणिपूरची घटना पाहता देशातील जवानही आज सुरक्षित नाहीत. शिवाय, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या सुरक्षा रक्षकांनीच केली होती, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी व बाळासाहेब देवरस यांना कठीण प्रसंगी देवानं मदत केली होती. देवाने सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली असताना भीती कसली बाळगायची? ही सुरक्षा सरसंघचालकांना सामान्य स्वयंसेवकापासून दूर तर करणार नाही ना? हे स्टेटस सिंबॉल तर ठऱणार नाही का? याचाही विचार व्हायला हवा, अशी पोस्ट भट यांनी टाकली होती.
भट यांच्या या पोस्टमुळं पक्षात व संघ वर्तुळात खळबळ उडाली होती. भाजपसह संघाच्या अनेक नेत्यांनी भट यांच्या या पोस्टवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भट यांनी माफी मागितली. मात्र, हे आपलं व्यक्तिगत मत आहे आणि चांगल्या भावनेनं मी ते मांडलं आहे. त्यामुळं ही पोस्ट काढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर दबाव वाढला होता. त्याचीच परिणती त्यांच्या राजीनाम्यात झाल्याचं बोललं जातंय.