नवी मुंबई : कोकण भवन येथे गुरूवारी इंडियन रेडक्रॉस सोसायटी या संघटनेमार्फत प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेस तहसिलदार (महसूल) नितीन वाघमारे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे समन्वयक विकास कुरणे, विभागीय समन्वयक, कोकण विभाग अस्मिता निकम उपस्थित होते.
कुरणे यांनी या कार्यशाळेत इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या विविध उपक्रमांविषयी यावेळी माहिती दिली. त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत विशिष्ट वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंत एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला कशा प्रकारे प्रथमोपचार द्यावयाचे याबाबत माहिती सांगितली. प्रथमोपचार कशा प्रकारे जखमी किंवा आजारी व्यक्तीला द्यावेत याबाबतच्या चित्रफीत व प्रात्याक्षिक यावेळी दाखविण्यात आले. या प्रशिक्षण कार्यशाळेस कोकण भवन येथील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.