पनवेल : 45 वर्षानंतर विकासकाची भुमिका घेवून अवतरलेल्या सिडको प्रशासनाने जर प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांवर वक्रनजर केली तर त्यांना रोखण्यासाठी गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील पंचवीसीच्या आतील 500 युवकांची फौज तयार राहून गरजेपोटी नियमीत घरांचे सरंक्षण करण्याचा निर्धार गव्हाण येथील शांतादेवी मंदिराच्या समोरील प्रकल्पग्रस्तांच्या निर्धार सभेत बुधवारी व्यक्त करण्यात आला.
गव्हाण विभागातील भुमीपुत्र लोकनेते रामशेठ ठाकूर, जे. एम.म्हात्रे, अरूण भगत, महेन्द्र घरत, रघुनाथ घरत, पांडुशेठ घरत, सरपंच रत्नप्रभा घरत, भाऊशेठ पाटील, वसंत म्हात्रे, सचिन घरत, जयश्री कोळी यांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रकल्पग्रस्तांनी या निर्धार सभेत भाग घेतला यामध्ये युवकांची उपस्थिती लक्षणीय होती व यापुढे सिडको प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक गावाची स्वतंत्र बैठक घेद्वन प्रत्येक गावातून किमान 100 ते 200 नावे या फौजेसाठी नोंदविण्यात आली. आजतागायत 500 युवकांची नोंदणी घेवून प्रत्येक व्हाटस्अप ग्रुपची निर्मिती करून अॅलर्ट देण्याचे ठरले. यावेळी सर्व नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरण्यासाठी आवाहन केले. भुमीहीन शेतमजूर, कोळी यांनाही भुखंड मिळवून देण्यासाठी विषेश प्रयत्न करणार असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी नमूद केले.
बंदुकीच्या जोरावर 1984 साली गोरगरीब निरपराध शेतकर्यांवर अमानुष गोळीबार करून अत्यंत कवडीमोल किंमतीत जबरदस्तीने जमिनीचे भुसंपादन करण्यात आले व शेतकर्यांच्या डोक्यावर विकासाचा नारळ फोडून नवी मुंबईचे हजारो कोटीचे साम्राज्य उभे करण्याचे काम सिडको प्रशासनाने केले. गव्हाण गावातील शेकडो भुमीहीन शेतमजूरांना अजूनही भुखंड देण्यासाठी सिडकोने प्रक्रिया सुरू केलेली नाही 21 व्या शतकातील शहर वसविताना ज्या भुमीपुत्रांनी जमिनीचा त्याग केला. त्यांच्या गावात मात्र नागरी सुविधांचा अभाव, वर सिडको प्रशासनांची मोगलाई म्हणजे नैसर्गिक गरजेपोटी बांधलेल्या घरांवर बुलडोझरचा धाक या विरूद्ध प्रकल्पग्रस्तांच्या भावना प्रक्षुब्ध झालेल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोषाची लाट पसरलेली आहे आणि म्हणून प्रकल्पग्रस्तांचा सहानुभुतीने विचार न करता हजारो झोपडपट्ट्यांना नागविण्याचा विचार करणार्या सिडको प्रशासनाला आज भिडण्याची गरज निर्माण झालेली आहे असे संतप्त विचार तरूणांनी मांडले.