मुंबई: सोमवारपासून सुरु होणार्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय.
विविध मंत्र्यांचे घोटाळे आणि वाद या पार्श्वभूमीवर सरकारला घेरण्यासाठी विरोधक एकवटलेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनं संयुक्त पत्रकार परिषद घेऊन चहापानावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा केली आणि अधिवेशनातील व्यूहरचनेची माहिती दिली.
शेतकरी आत्महत्यांबाबत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. सरकारमध्ये सामील असलेल्या दोन्ही पक्षातच संवाद नसल्याची टीका त्यांनी शिवसेना भाजपवर केलीय.
तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला लक्ष्य केलं. घोटाळेबाज मंत्र्यांना चौकशी न करता क्लीन चीट मिळते कशी असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केलाय.