नाशिक : नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर त्र्यंबकेश्वर येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहणाने कुंभमेळ्याच्या पावन पर्वाची सुरुवात झाली. मंगळवारी सहा वाजून 14 मिनिटांनी सिंह राशीत गुरूने प्रवेश करताच सिंहस्थ कुंभ पर्वाला प्रारंभ झाला.
त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यावेळी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात आली. या सोहळ्यासाठी 50 किलो वजनाची पंचधातूची ध्वजपताका तयार करण्यात आली आहे. या पताकेवर गुरू, सूर्य, चंद्र, गोदावरी व वाहन मगर, दशदिशा, बारा राशी यांसह ओम र्हीम, स्वस्तिक अशी चिन्हे आहेत. ध्वजपताकेवर दोन लाख खर्च झाला आहे. कुशावर्त तीर्थावर 31 फूट उंचीच्या खांबावर ही पताका बसवण्यात आली.
या वेळी सर्व आखाड्यांच्या साधू महंतांसह भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. दर 12 वर्षांनी होणार्या या कुंभ मेळ्याचे सर्वच हिंदु धर्मियांसाठी खास महत्त्व असते. या काळात नाशिकमध्ये स्नानासाठी भावीक आवर्जुन येत असतात.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने स्नानाला असलेले महत्त्व पाहता भाविक नाशिकमध्ये चांगलीच गर्दी करत असतात. आजही पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. धव्जारोहणाचा कार्यक्रम संपताच भाविकांनी गोदावरीमध्ये या कुंभमेळ्याच्या पहिल्या दिवशी स्नान केले. पहिल्या दिवशी स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे अनेक भाविक आज दिवसभर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दी करणार आहेत.