ठाणे : ठाणे व नवी मुंबई या औद्योगिक परिसरातील उद्योजकांच्या सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांचे होणारे नुकसान या संदर्भात खासदार राजन विचारे यांनी ठाणे लघु उद्योग संघटनेचे (टीसा) या संस्थेचे एम. आर. खांबीटे व महाराष्ट्र विद्युत महावितरण महामंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांच्या समवेत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ठाणे विभाग कार्यकारी अभियंता देशपांडे, वाशी विभाग कार्यकारी अभियंता सुरवडे व महावितरण महामंडळाचे इतर वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबई नगरसेवक मनोज हळदणकर, प्रशांत पाटील, राजू पाटील, (टीसा) या संस्थेचे उपाध्यक्ष आशिष शिरसाट, कार्यकारी सचिव एकनाथ सोनावणे व पदाधिकारी निपुण मेहता, चेतन वैश्यपायन, पंडित पाडी, रोहित मेनन व भावेश मारू व इतर उद्योजक उपस्थित होते.
या बैठकीत औद्योगिक परिसरात ५० वर्षापेक्षा जास्त जुन्या असलेल्या सालशेत वाहिनी कमकुवत झाल्याने वारंवार बिघाड होत असतो. त्यामुळे या वाहिनी बदलण्यात याव्यात तसेच ठाणे शहरात सुमारे ५२ औद्योगिक वसाहतीमध्ये बहुतांशी लघुउद्योग आहेत त्यातील कोलशेत रोड व घोडबंदर रोड या विभागात वीज पुरवठा हा भूमिगत नसल्याने मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित होत असतो त्या वाहिनी भूमिगत करून घ्या अशा सूचना खासदार राजन विचारे यांनी अधिकार्यांना दिल्या त्यावर त्यांनी या कामाला दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन महावितरण अधिकार्यांनी दिले. तसेच काही वीज वाहिन्या वन जमिनीमधून जात असल्याने वीज कर्मचार्यांना वन अधिकार्यांकडून परवानगी प्राप्त होत नसल्याने त्यांना काम करता येत नाही. त्यासाठी खासदार राजन विचारे यांनी पुढाकार घेऊन जर परवानगी मिळत नसेल तर माझ्याशी संपर्क साधावा किंवा तसेच वाढलेल्या झाडांच्या फांद्या कापण्यासाठी महापालिकेकडून परवानगी प्राप्त न झाल्याने यासाठीही विलंब लागतो व शहरातील काही नवीन रस्त्यांचे कॉक्रीटीकरण होण्यापूर्वी पूर्वनियोजित कलवट टाकण्यासाठी महावितरण व महापालिका मुख्य अभियंता यांची एक बैठक आयोजित करण्यात यावी असे सुचविण्यात आले. तसेच उपस्थित केलेल्या हिरानंदानी मेडॉस येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील रस्त्याच्या मध्यभागी असणारे विद्युत पोल तत्काळ हटवावे की जेणेकरून अपघात होणार नाहीत अशा सूचना अधिकार्यांना दिल्या. ठाणे शहरातील या फिडरच्या जीर्ण झालेल्या वीज तारा बदलण्यासाठी टाटा पावर हाउस, टाळशेत भांडूप ते एम.आय.डी.सी. वागळे इस्टेट या कामासाठी मंजूर झालेल्या पाच कोटीच्या कामास लवकरात लवकर सुरवात करण्यात यावी असे अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आणि औद्योगिक वसाहतीमधील असणार्या व नागरी वस्तीत असणार्या वीजवाहिन्या यांचा विद्युत पुरवठा हा वेगवेगळ्या करण्यात यावा जेणेकरून वसाहतीमध्ये खंडित झालेला विद्युत वाहिनीचे काम पूर्ण होई पर्यंत लागणार्या वेळामुळे उद्योगासाठी लागणारी वीज वाहिनी खंडित करण्यात येते, याचा त्रास उद्योजकांना होत असतो.
तसेच ऐरोली व घणसोली विभागात सतत खंडित होणारा वीज पुरवठा व मिटरची रीडिंग घेणारे एजन्सीवाले हे ३० दिवसाची रीडिंग न घेता ४० दिवसांची घेत असल्याने युनिट वाढत असल्याने दरही वाढतो त्यामुळे ग्राहकांना १००० रुपयांच्या बदल्यात १५०० रुपये मोजावे लागतात याबाबत स्थानिक नगरसेवक मनोज हळदणकर, प्रशांत पाटील यांनी उपस्थित केल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी याचा जाब विचारला त्यावर त्यांनी ऐरोलीमध्ये १० एम.व्ही.ए. ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ऐरोली व घणसोलीतील नागरिकांना विद्युत पुरवठा नियमित सुरु राहील व रीडिंग वेळेत घेण्यात यावे अशा सूचना एजेन्सीला देण्यात येतील असे आश्वासन अधिकार्यांनी दिले.
या झालेल्या संपूर्ण चर्चेनंतर मुख्य अभियंता सतीश कर्पे यांनी दिवाळी पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.