संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : सध्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये साथीच्या रोगांचा उद्रेक होवू नये यासाठी प्रभाग क्रं ८५ व ८६च्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे बुधवार, दि. १५ जुलै व गुरूवार, दि. १६ जुलै रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी दिली.
पावसाळ्यात ताप, हिवताप, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू आदी रोगाचे रूग्ण नवी मुंबईत आढळून दरवर्षी साथीच्या रोगाचा उद्रेक हा होत असतो. सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरातही ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू आदी आजाराचे रूग्ण आढळल्याने प्रभाग क्रं ८५ व ८६च्या वतीने आरोग्य विभागाच्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर तातडीने आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रभाग ८५ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी दिली.
बुधवार, दि. १५ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत सारसोळे गाव, होळी मैदानानजीकच्या साई अपार्टमेंटमधील शॉप क्रं. ३ येथे हे आरोग्य शिबिर होणार असून गुरूवार दि. १६ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत तुलसी छाया अपार्टंमेंटमील प्रभाग ८५ व ८६च्या मध्यवर्ती कार्यालयात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रभाग क्रं. ८६च्या नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांनी दिली.
साथीच्या आजाराचा उद्रेक होवून उपचार करण्यापेक्षा आजार न होण्याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना करून स्वच्छतेबाबत जागृकता दाखविणे गरजेचे असल्याबाबतचे विस्तृत मार्गदर्शन सारसोळे गावच्या ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर ६ मधील रहीवाशांना मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुरज पाटील यांनी दिली.