नवी मुंबई : महापालिका सभागृहात ५० टक्के महिला आरक्षणामुळे १११ सभासद संख्या असलेल्या सभागृहात तब्बल ५६ जागा महिलांकरता राखीव झाल्या. पण पुरूषासाठी असलेल्या प्रभागातून काही महिला उमेदवार विजयी झाल्याने आज सभागृहात ६२ महिला नगरसेविका दिसत आहे. घर सांभाळणार्या महिला आरक्षणामुळे सभागृहात आल्या. घर सक्षमपणे सांभाळणार्या महिला राजकारणातदेखील सक्षमपणे वाटचाल करू शकतात, हे जुईनगर, प्रभाग ८३मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. तनुजा श्रीधर मढवी यांच्या अवघ्या अडीच-तीन महिन्याच्या वाटचालीवरून पहावयास मिळत आहे.
महापालिकेच्या पाचव्या सभागृहात जुईनगर, प्रभाग ८३ मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सौ. तनुजा श्रीधर मढवी या ४८५ मतांची आघाडी घेवून विजयी झाल्या. या प्रभागात १२ हजाराहून अधिक लोकसंख्या असून ६११७ महापालिका निवडणूकीत मतदार होते. जुईनगर सेक्टर २४ आणि जुईपाडा गावाचा या प्रभागात समावेश होत आहे. या प्रभागात ६८ खासगी गृहनिर्माण सोसायट्या तर सिडकोच्या ५ गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. तनुजा मढवींचा राजकारणाशी फारसा गंध नव्हता. त्यांचे यजमान श्रीधर मढवी व मुलगा जयेश मढवी मात्र सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय होते. तनुजा मढवी व श्रीधर मढवी हे राजकारणात सक्रिय नसले तरी प्रारंभापासून गणेश नाईकसमर्थंकच होते. यजमानांच्या व मुलाच्या जनसंपर्काचा व सामाजिक तसेच राजकीय कार्याचा निवडणूक प्रचारामध्ये आपणास फायदा झाला असल्याचे स्पष्ट कबुली नगरसेविका सौ. तनुजा मढवी यांनी दिली.
आपल्या प्रभागात फारशी कामे न झाल्याने नागरी सुविधांचा अभाव होता आणि नागरी समस्यांचा रहीवाशांना प्रचंड प्रमाणावर त्रास सहन करावा लागल्याने प्रचारादरम्यान आपण मतदारांना एक संधी प्रभागाच्या विकासासाठी याच घोषणेवर मतदान मागितले. मतदारांनी मतपेटीतून विश्वास दाखविला आणि महापालिका सभागृहात प्रभागाच्या विकासासाठी मला पाठविले असल्याचे नगरसेविका सौ. तनुजा मढवी यांनी सांगितले.
नगरसेविका झाल्यापासून नगरसेविका सौ. तनुजा मढवी, यजमान श्रीधर मढवी व मुलगा जयेश मढवी यांनी प्रभागातील कामासाठी पूर्णवेळ झोकून दिल्याने प्रभागातील रहीवाशांना ‘मढवी परिवार रमलंय प्रभागाच्या विकासकामात’ या राजकीय जनहितैषी प्रयोगाचे जवळून दर्शन होत आहे. नगरसेविका झाल्यावर सौ. तनुजा मढवी यांनी पहिल्या दिवसापासून प्रभागाच्या विकासकामांवर व नागरी समस्या निवारणावर भर दिल्याचे पहावयास मिळत आहे.
२३ एप्रिलला मी नगरसेविका झाले, १० मेपासून खर्या अर्थांने महापालिका सभागृहात कार्यरत झाले. या कालावधीत मी प्रभागामध्ये आजपर्यत दोन वेळा स्वच्छता अभियान राबविले आहे. स्वच्छता अभियानात महापालिका कर्मचार्यांसोबत खासगी कर्मचारी आणून मी या अभियानात स्वत: सहभागी झाले. कचरा काढला, डेब्रिज हटविले. मी नगरसेविका म्हणून नाही तर एक स्वच्छता कामगार म्हणून या अभियानात सहभागी झाले. परिसरातील रहीवाशांकरता नेत्रचिकीत्सा शिबिर राबविले. विभागातील विद्यार्थ्यांकरता मोफत वह्या वाटप केले. विभागातील नागरी समस्या निवारणाचा पाठपुरावा करण्याकरता आणि नागरी सुविधांच्या उपलब्धतेकरता आठवड्यातून दोन वेळा महापालिका मुख्यालयात जावून संबंधित अधिकार्यांच्या भेटी घेत असते. तसेच माझ्या प्रभागाचा नेरूळ-तुर्भे या दोन विभागात समावेश होत असल्याने दोनही ठिकाणच्या विभाग कार्यालयाशी सातत्याने संपर्क ठेवून समस्यांचे निवारण करून घेत असल्याची माहिती नगरसेविका सौ. तनुजा मढवी यांनी दिली.
प्रभाग स्वच्छता आणि घरटी जनसंपर्क याच एकमेव ध्येयानेे आपण कार्यरत असून गृहनिर्माण सोसायट्यांना कचराकुंड्यांचे वितरण सुरू केले आहे. महापालिका प्रशासनाकडे कचराकुंड्यांचा तुटवडा असल्याने लवकरच प्रशासनाकडून कचराकुंड्या उपलब्ध होताच प्रभागातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांना कचराकुंड्यांचे वितरण केले जाणार आहे. प्रभागातील अधिकांश ठिकाणी गटांरावर झाकणेच नसल्यानेे रहीवाशांना विविध अडीअडचणींचा सामना करावा लागत असे. गटारांवर झाकणे बसविण्याकरता महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्यामुळे अर्ध्याहून अधिक ठिकाणी गटारांवर झाकणे पालिका प्रशासनाकडून बसवून घेतली आहेत. उर्वरित गटारांवर लवकरच महापालिकेच्या माध्यमातून झाकणे बसविली जाणार आहेत. स्वत: उभी राहून मूषक नियत्रंण कर्मचार्यांसोबत त्याही समस्येचे निवारण करण्याला प्राधान्य दिले आहे. धुरीकरण कर्मचार्यांसोबतही प्रभागात फिरून डास नियत्रंणात व साथीच्या रोगांचा उद्रेक होवू नये याची काळजी घेणार असल्याचे नगरसेविका सौ. तनुजा मढवी यांनी सामगितले.
महापालिकेची प्रभागात शाळा क्रं. १७ ही एकमेव शाळा असून प्रभागात नागरी आरोग्य केंद्र महापालिकेने सुरू करावे याकरता पाठपुरावा सुरू केला आहे. जुन्या व्यायामशाळेच्या ठिकाणी हे आरोग्य केंद्र उभारावे अशी आपली मागणी आहे. प्रभागात दोन स्वच्छतागृह बांधण्याकरता आपला पाठपुरावा असुन क्रिडांगणात एका ठिकाणी कोपर्यात स्वच्छतागृह उभारण्याला आपण प्राधान्य देणार आहे. क्रिडांगण व उद्यान यातील सुविधांनाही प्राधान्य असणार आहे. नुकत्याच पालिकेच्या महिला कल्याण योजनेतर्ंगत २४ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पदपथ व रस्ते आदी कामे करून लवकरच प्रभाग सुविधांनी सज्ज व समस्यांनी मुक्त झालेला पहावयास मिळेल असा विश्वास नगरसेविका सौ. तनुजा मढवी यांनी बोलताना व्यक्त केला.