नवी दिल्ली : ललित मोदी यांना नव्हे तर त्यांच्या पत्नीला मानवतेच्या दृष्टीकोनातूनच मदत केली असून ते बेकायदेशीर आहे असे संसदेला वाटत असेल, तर होय मी अपराध केला आहे, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी संसदेत सांगितले.
मी ललित मोदींना मदत केली नाही, तर त्यांच्या पत्नीच्या उपचारांसाठी मदत केली, माझ्या ठिकाणी सोनिया गांधी असत्या तर त्यांनी काय केले असते, असा उलट सवाल सुषमा स्वराज यांनी केला आहे.
स्वराज यांनी गुरुवारी लोकसभेत निवेदन केले. यावेळी बोलताना त्यांनी ‘मी ललित मोदी यांना कोणतीही बेकायदेशीर मदत केली असेल तर त्याचा एकतरी पुरावा सादर करा’, असे थेट आव्हानच विरोधकांना दिले आहे.
तसेच आपल्यावर केलेले आरोप धादांत खोटे, चुकीचे व निराधार आहेत. जर मी ललित मोदी यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून केलेली मदत बेकायेदशीर आहे असे संसदेला वाटत असेल, तर होय मी हा अपराध केला आहे. त्यासाठी संसद देईल तो निर्णय स्वीकारण्यास मी तयार आहे, असेही सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.
ललित मोदी यांची पत्नी कर्करोगाने आजारी असल्याने मी त्यांना फक्त माणुसकीच्या नात्याने सहकार्य केले. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून मी दोन्ही सभागृहात बसून आहे. परंतू मला माझी बाजू मांडण्याची संधी न देता विरोधकांनी गदारोळ केला. हा माझ्यावर झालेला अन्याय आहे, असेही त्या म्हणाल्या. तसेच माझे ग्रह सध्या फिरले आहेत, माझ्यावर माझेच सहकारी आरोप करत आहेत, असेही भावनिक होत त्यांनी सांगितले.
आयपीएल बेटिंग, पैशाची अफरातफर प्रकरणी ललित मोदी आरोपी असून ते फरार आहेत. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ललित मोदींना नोटीस बजावली असून ते इंग्लंडमध्ये लपून बसले आहेत. त्यांना मदत केल्याचा सुषमा स्वराज यांच्यावर आरोप आहे. या मुद्यावरून विरोधकांनी स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच या मागणीसाठी तीन आठवड्यांपासून संसदेचे कामकाज विरोधकांनी रोखून धरले आहे. अखेर स्वराज यांनी याप्रकरणी लोकसभेत आपली बाजू मांडली.