***
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील नदीपात्रात झाडाच्या फांदीला मंगळवारी रात्रीच्या सुमारास तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्याजवळ सुसाईड नोट सापडली असून पत्नीशी भांडण झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.
राम तुळशीराम मोरे (वय २३, रा. राजीव गांधी नगर, शिवाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. स्थानिक रहिवाशी जीवरक्षक राजेश काची यांना सकाळी सातच्या सुमारास नदीपात्रातील झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. काची यांनी तातडीने शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्थानिक तरुण शिवाजी रिड्डे, सनी शिंदे आणि सचिन कोकणे यांच्या मदतीने झाडाला लटकलेला मृतदेह खाली उतरविला. मृत मोरे हा नवी पेठ परिसरात मोटरसायकल गॅरेजमध्ये मेकॅनिकलचे काम करत होता. त्याचे काही दिवसांपूर्वी पत्नीशी भांडण झाले होते. पत्नी आठ दिवसांपूर्वी त्याला न सांगता घर सोडून गेल्यामुळे निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मोरे याने आत्महत्या केली.
***
मोटारीतील तिघांना अटक बोगस रेशनकार्ड; बनावट ओळखपत्र
पिंपरी : संशयावरून पकडलेल्या मोटारीतील तिघा जणांकडे तब्बल १६ बोगस रेशनकार्डसह माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे शिफारस पत्र, लोकसभेचे बनावट ओळखपत्र आढळून आले. मोटारीवर सुद्धा ‘व्हीआयपी’ असे लिहून मिरवत होते. हिंजवडी पोलसांनी तिघांना गजाआड केले असून न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
संतोष रुधाजी चौधरी (वय-३९,रा.कळंबोली,मुंबई), रमेश कानाराम गेहलोत (वय-३१,रा. अजंठानगर,चिंचवड), कानाराम सुखाराम चौधरी (वय-३२,रा.हिंजवडी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. फौजदार नितीन खामगळ यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील भुमकर चौक रस्त्यावर मोटारीतून तीन जण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली . त्यानुसार, पोलीसांनी मोटार अडवून तपासणी केली असता तिघांकडे विविध नागरिकांचे नाव व पत्ते असलेले केशरी रंगाची सोळा रेशनकार्ड, अखिल भारतीय पोलीस सदस्य केंद्र सरकार असे ओळखपत्र आणि त्यावर देशाची राजमुद्रा असलेला रबरी गोल शिक्का, लेटर पॅडची प्रत, राजमुद्रा तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची स्वाक्षरी असलेले आरोपी रमेश गहलोत याच्या नावाचे १० ऑक्टोंबर २०१३ चे शिफारस पत्र, तसेच आरोपी कानाराम चौधरी याच्याकडे गृहमंत्रालयाचे केंद्र सरकारचे लोकसभेचे ओळखपत्र त्यावर कानाराम याचा फोटो अशी विविध बनावट कागदपत्रे आढळून आले, असे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.