ठाणे : हिंदु आणि मुसलमान समाजामध्ये तणाव निर्माण व्हावा. त्यातून उसळणार्या दंगलीवर आपली राजकीय पोळी भाजून घेता यावी यासाठीच केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीचे प्रदर्शन केले, अशी सणसणीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी ठाणे येथे केली. मन की बात करणारे नरेंद्र मोदी आता का मौन धरून बसले आहेत, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
ठाणे येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शेकडो लोकांचे प्राण घेणार्या याकूब मेमनच्या फाशीचे राजकारण का करता? त्याचे प्रदर्शन करतात? आणि प्रसार माध्यमेही त्यांच्याबरोबर वाहवत जातात. याकूब मेमनने कधी नाष्टा केला, त्याने कोणते पुस्तक वाचले. किती वाजता फाशी दिली. नागपूरला विमान निघाले. मुंबईत पोहचले. मिनिटामिनिटाची खबर. कशासाठी दाखवता? कहर म्हणजे याकूबचा भाऊ टायगर मेमन त्याच्या आईशी बोलतो आणि सांगतो मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. तो जे आपल्या आईशी बोलला तो शब्द अन् शब्द कसा काय छापून येतो. याचा अर्थ कुणी तरी पोलिसांनीच ही माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहचविली असेल. कशासाठी? ही इतकी साधी गोष्ट नाही. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. याकूबच्या फाशीचे प्रदर्शन पाहून मुस्लीम तरुणांची माथी भडकावीत आणि टागर मेमनची मुलाखत वाचून हिंदू तरुणांची माथी भडकावीत. त्यांच्यात दंगल व्हावी आणि त्या दंगलीच्या आगीत आपली राजकीय पोळी भाजून घेता यावी यासाठीच केंद्र आणि राज्य सरकारने याकूबच्या फाशीचे असे राजकारण केले.
राज्यात भाजपाचे सरकार आल्याने सामान्य माणसाला कोणताही दिलासा मिळालेला नाही. उलट परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे केवळ शोभेचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे हात आणि पाय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बांधलेले आहेत. ते स्वत: कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. राज्यातील भाजपा सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला ऊत आलेला आहे. मला एक सरकारी अधिकारी भेटले होते. त्यांनी सांगितले की गेल्या आठ महिन्यात केवळ शासकीय अधिकार्यांच्या बदल्या करण्यासाठी 100 कोटींची उलाढाल झाली. असे सरकार शेतकरी, कष्टकरी आणि मराठी माणसाला काय न्याय देणार? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
याकूब मेमनला फाशी दिल्यावर तमाशा बनवून ठेवला, यावरुन असे वाटते की, या सरकारला दंगली हव्या आहेत. इतक्या लवकर या सरकारचे भांडाफोड होईल असे वाटले नव्हते, चांगल्या रन काढण्याऐवजी चिक्की रन काढीत आहेत. बाबासाहेब पुरुंदरे यांच्या नावावर राजकारण सुरु आहे, हे निंदनीय आहे. वय वर्ष 90 असणार्या बाबासाहेबांना राष्ट्रवादी नेते एकेरी नावाने हाक मारतात, तो एक ठाण्याचा वळवळतो आहे. लायकी आहे का बाबासाहेबांबद्दल यांची बोलण्याची. आपल्याकडे कुंपणच शेत खातं आहे. आपलेच अधिकारी परप्रांतीयांना खोटे दाखले देत आहेत. परप्रांतियांना पोसण्याचे काम दुर्दैवाने भाजप सरकार करीत आहे. तिकडे ते नरेंद्र मोदी गप्प बसतात, कसली मन की बात. मोदी म्हणजे शेवटची आशा आहे, पण तेच जर गुजरातचा जप करतात. मोदी आणि शहा सत्तेत आल्यापासून गुजराती समाजाला कसलं फेफडं आलं आहे? नॉनव्हेज खाण्यास बंदी, गुजराती समाजातील नागरिकांची ही कोणती जबरदस्ती, असा सवाल राज यांनी यावेळी केला. जिथे अन्याय दिसेल तिथे लाथ मारलीच पाहिजे, असे आवाहन राज यांनी कार्यकर्त्यांना केले.माझी आणि उद्धवची भेट झाल्याची बातम्या पुरविल्या जात आहेत, भेट नाही, गाठ नाही यांच्या राजकारणासाठी या बातम्या पुरवल्या जात आहेत, असेही राज यांनी स्पष्ट केले.