नाशिक : कांद्याची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारपेठेत कांदा किलोमागे ४३ रुपयांवर पोहोचला आहे. यंदा हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी पडत असल्याने कांद्याच्या किमती कडाडत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कांदा व्यापार्यांनी सांगितले, अपुरे उत्पादन आणि कमी पुरवठा यामुळे कांद्याच्या किमतीचे गणित बिघडले आहे.
जुलै ते सप्टेंबर या काळात असेच चित्र राहण्याची शक्यता आहे. देशात सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्रात होते. मात्र यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका कांद्याला बसला आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.
सोमवारी लासलगावात ३५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. वर्षभरापूर्वी याच काळात १० हजार क्विंटलवर कांद्याची आवक होती. कांद्याचे भाव पुन्हा वाढतील या आशेने अनेक उत्पादक कांद्याची साठवण करून ठेवत आहेत. कांदा उत्पादक सध्या हातचे राखून बाजारात कांदा आणत आहेत.
*** नाफेडकडून नव्याने निविदा
देशातील बाजारपेठांत कांद्याची आवक वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. यासाठी नाफेड या सहकारी संस्थेने १० हजार टन कांदा आयातीसाठी नव्याने निविदा काढल्या आहेत. नाफेडने यापूर्वीही निविदा काढल्या होत्या, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. पाकिस्तान, चीन, इजिप्त या देशांवर आता मदार आहे.
*** दिल्लीत कांदा साठीत
लासलगावात यंदाचा विक्रमी भाव मिळवणारा कांदा राजधानीतही चढ्या भावात विक्री होत आहे. सोमवारी दिल्लीत कांदा ६० रुपये किलोने विक्री होत होता. नाफेड आणि स्मॉल फार्मर्स ऍग्रिबिझनेस संस्थेकडून दिल्लीत स्वस्तात कांदा उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहेत.