नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील एस.के. व्हिल्स या वाहनांच्या शो रुमसमोरील रस्त्यावर गेले अनेक महिने खडडे पडले होते. या रस्त्याचा आज आमदार संदीप नाईक आणि महापौर सुधाकर सोनावणे यांनी पाहणीदौरा केला. यानंतर या रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे.
नवी मुबईत सिडको, सार्वजनिक बांधकाम खाते, एमआयडीसी आणि महापलिका यांच्या माध्यमातून रस्ते बांधले गेले आहेत. हे रस्ते नादुरुस्त होवून वाहतुककोंडी निर्माण होवू नये, आबालवृध्द प्रवाशांना त्रास होवू नये यासाठी रस्ते सुस्थितीत राहणे आवश्यक असल्याचे आमदार नाईक म्हणाले. न्यायालयाने देखील प्राधिकरणांना आपापल्या हद्दीतील रस्ते सुस्थितीत राखावेत, असे निर्देश दिल्याची माहिती त्यांनी दिली. मोठे रस्ते तयार होतात, मात्र विविध प्राधिकरणांमध्ये समन्वय नसल्याने या रस्त्याचा एखादा भाग दुर्लक्षित राहतो. या नादुरुस्त भागामुळे वाहतुककोंडी होते. अपघात घडतात. वाहनांचे नुकसान होते. या समस्यांवर मार्ग काढावयास हवा. त्यासाठी पाहणीदौर्याचे आयोजन केल्याचे आमदार नाईक म्हणाले. योग्य प्रकारे काम होत असेल तर पाहणीदौरे करण्याची आवश्यकता नाही मात्र चांगले आणि दर्जेदार काम होत नसेल तर नागरिकांसाठी रस्त्यावर उतरावे लागते, असे आमदार नाईक म्हणाले. श्री गणेशाचे लवकरच आगमन होत आहे. हे आगमन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी नियोजन करण्याचे आदेश महापौर सोनावणे यांनी पालिकेच्या अधिकार्यांना दिले आहेत. त्याबददल आमदार नाईक यांनी महापौरांचे आभार मानले. महापौरांच्या अध्यक्षतेखाली लवकरच विविध प्राधिकरणांची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत आमदार नाईक देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत एखाद्या रस्त्याचे काम रखडले असेल तर ते का रखडले आहे? कोणत्या खात्याची परवानगी प्रलंबित आहे काय? अशा विषयांवर चर्चा होवून कामातील अडथळे दूर करुन ते काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. विविध प्राधिकरणांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. महापालिकेने ठाणे बेलापूर मार्गाची निर्मिती केली. अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण केले आहे. मात्र इतर प्राधिकरणांचे रस्ते देखील चांगले हवेत ते नसतील तर प्रवाशांना त्रास होतो, असे मत आमदार नाईक यांनी मांडले. विविध प्राधिकरणांच्या हद्दीच्या वादामुळे रस्त्यांची कामे रखडतात. त्यामुळे रस्त्यांचे मॅपिंग करण्यात येणार असल्याचे आमदार नाईक यांनी नमूद केले. तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम खाते बांधत असलेला स्कायवॉक अर्धवट आहे. या स्कायवॉक सारखी कामे अर्धवट राहू नये म्हणून बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस स्टेशनचा तलावाकडे जाणारा रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन देखील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी आमदार नाईक यांना या पाहणीदौर्यात दिले आहे.
माजी नगरसेवक अमित मेढकर, कार्यकर्ते शिवाजी जाधव, लक्ष्मण जाधव, जगदिश पाटील, प्रविण वास्कर, सुनंदा निकम, श्री ठाकूर, आरटीओ, वाहतुक नियंत्रण शाखा, पोलीस, महापालिका, एमआयडीसी, सार्वजनिक बंाधकाम खात्याचे अधिकारी या दौर्याप्रसंगी उपस्थित होते.