* कुकशेतच्या समस्या निवारणासाठी आमदार मंदाताईंचा पुढाकार
नवी मुंबई : बेलापुरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गावठाणातील समस्या सोडविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कंबर कसली असून गावागावांना भेटी देवून ग्रामस्थांशी चर्चा करून गावठाण समस्यामुक्त करण्यासाठी त्यांचे परिश्रम सुरू आहे. नेरूळ नोडमधील सारसोळेपाठोपाठ त्यांनी आता कुकशेत गावावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे गेल्या काही दिवसामध्ये पहावयास मिळत आहे.
नेरूळ सेक्टर 14 येथे सन 1997 सालच्या दरम्यान हार्डीलिया कंपनीच्या शेजारी असलेले कुकशेत गावचे संपूर्ण स्थलांतर करण्यात आले. शासनाने या गावचे स्थलांतर करताना कुकशेत गावाला हार्डीलिया कंपनीच्या विषारी वायूपासून वाचविणे आणि नवी मुंबई च्या विकास प्रकल्पासाठी सदर गावची जागा उपलब्ध करून देण्यासाठी या गावचे पुनर्वसन नेरूळ सेक्टर 14 येथे तातडीने करण्यात आले होते.
पुनर्वसन करताना शासनाने देवू केलेल्या सेवा सुविधा आणि सोई सवलती यांची समाधानकारक पूर्तता केली नसल्याने बेलापूर मतदारसंघाच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची ग्रामस्थांसमवेत भेट घेतली आणि अनेक समस्या लवकरात लवकर सोडवून देण्याचे तत्वत: मान्य करून स्थानिक कुकशेतच्या ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला.
यामध्ये प्रामुख्याने कुकशेत गावातील घरे ही स्थानिक प्रकल्पग्रस्त पुनर्वसित शेतकर्यांची आहेत. त्यांच्या घरांना लावलेला मालमत्ता कर हा गावठाण घरांना लावलेला आहे, त्याप्रमाणेच लावण्यात येईल, याशिवाय ज्यांच्या मालमत्ता करावर व्याज, दंड आणि विलंब शुल्क संपूर्ण माफ केले जाईल असे आश्वासन आयुक्त श्री.दिनेश वाघमारे यांनी दिले. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाणार असल्याने कुकशेत गावच्या रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी हा प्रश्न सोडविल्याबद्दल ग्रामस्थ आभार व्यक्त करीत आहेत.
महापालिका आयुक्तांसमवेत आमदार मंदाताई म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीस सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे नवी मुंबईतील लढवय्ये नेते नामदेव भगत, डॉ. राजेश पाटील, कृष्णा पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.