नवी मुंबई : मा.उच्च न्यायालयाने दिनांक ०४/०३/२०१५ रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेमधील आठही विभाग कार्यालयांमध्ये अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.
या तक्रार निवारण कक्षांव्दारे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत असून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ (८) च्या अनुषंगाने अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्याकरीता विभाग अधिकारी यांना दिनांक ०७ जुलै २०१५ रोजीच्या राजपत्रात पदनिर्देशित अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कुठेही अनधिकृत बांधकाम होत असल्यास नागरिकांना त्याबाबतची माहिती दूरध्वनीव्दारे संबंधित विभाग अधिकारी यांना सहजपणे व विनामूल्य देता यावी याकरीता प्रत्येक विभाग कार्यालयात टोल फ्री दूरध्वनी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
सदरचे विभाग कार्यालयनिहाय टोल फ्री क्रमांक – बेलापूर विभाग कार्यालय – १८००२२२३१२, नेरुळ विभाग कार्यालय – १८००२२२३१३, तुर्भे विभाग कार्यालय – १८००२२२३१४, वाशी वाशी विभाग कार्यालय – १८००२२२३१५, कोपरखैरणे विभाग कार्यालय – १८००२२२३१६, घणसोली घणसोली विभाग कार्यालय – १८००२२२३१७, ऐरोली विभाग कार्यालय – १८००२२२३१८, दिघा विभाग कार्यालय – १८००२२२३१९ याप्रमाणे असून महापालिका मुख्यालय इमारतीत यापुर्वीच कार्यान्वित असलेले – १८००२२२३०९ व १८००२२२३१० हे टोल फ्री क्रमांक पुर्वीप्रमाणेच कार्यरत असणार आहेत. नागरिकांनी या विनामूल्य टोल फ्री दूरध्वनी सुविधेचा वापर करुन आपले नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर व सुनियोजित राखण्यात नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांनी दूरध्वनीव्दारे अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्यानंतर तक्रार निवारण कक्षामार्फत संबंधित अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्यात येऊन तक्रारदार नागरिकासही त्याबाबत अवगत करण्यात येईल. तरी नागरिकांनी महानगरपालिकेची बांधकामास पूर्व परवानगी न घेता किंवा भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून न घेता बांधलेल्या इमारती / फ्लॅटची खरेदी करू नये. या इमारतींवर महानगरपालिकेकडून निष्कासनाची कारवाई करण्यात येईल तसेच अशा इमारतींना महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा / मलनि:स्सारण सुविधा पुरविण्यात येणार नाहीत याचीही नोंद नागरिकांनी घ्यावी. अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेस नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.