मुंबई : माणूस प्रेमात पडला की काहीही सोडण्यास तयार असतो, याचा प्रयत्य अभिनेता रणबीर कपूरबाबत सध्या पाहायला मिळत आहे. प्रेयसी कॅटरिना कैफच्या आग्रहाखातर रणबीरने सिगारेटपासून दोन हात लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ऑस्ट्रेलियातील एका व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन सिगारेट सोडण्याचे उपचार घेतले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून रणबीरला सिगारेट ओढण्याची सवय आहे. रणबीर आणि कॅटरिना यांचे प्रेमसंबंध सुरू झाल्यापासून कॅटला ही बाब अतिशय खटकत होती. त्यामुळे तिने त्याला अनेकदा सिगारेट ओढू नको, असे सांगितले होते. मात्र, काही केल्या तो ऐकत नव्हता. काही महिन्यांपूर्वी रणबीर कपूरने त्याच्या वाढदिवसानिमित्त घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. या वेळी त्याचे अनेक मित्र उपस्थित होते. तेव्हा कॅटने त्याला मला आजच्या दिवशी केवळ एकच वचन पाहिजे ते म्हणजे सिगारेट सोडण्याचे, अशी मागणी त्याच्याकडे केली. त्यावर रणबीरला काहीही सुचले नाही. त्याने वचन न देता वेळ मारून नेली. मात्र, कॅटने जणू त्याची सिगारेट सोडण्याचा चंगच बांधला. आणि त्यादृष्टीने त्याचे मन वळवण्यास सुरुवात केली.
काही दिवसांपूर्वी कॅट त्याला ऑस्ट्रेलियातील एका व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन गेली होती. त्यानंतर रणबीर केंद्रात चार दिवस मुक्कामी होता. सिगारेट सुटल्याची खात्री पटल्यानंतरच तो केंद्रातून बाहेर पडला. अखेर कॅटरिनाने आपल्या भावी पतीची सिगोरट ओढणे बंद करून दाखवले, अशी चर्चा बॉलीवूडच्या वर्तुळात आहे.