बेंगळूरू : कर्नाटक सरकारने ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, संशोधक आणि माजी कुलगुरू डॉ. एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्याचा आदेश दिला आहे.
धारवाड कल्याण नगरमध्ये रहाणारे कलबुर्गी रविवारी सकाळी घरातच असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गोळया झाडून हत्या केली होती.
संपत्तीच्या वादातून कलबुर्गी यांची हत्या झाली अशी सुरुवातीला अफवा पसरली होती. मात्र कलबुर्गी सत्य बोलत असल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली असा त्यांच्या कुटुंबियांचा दावा आहे.
कलबुर्गी यांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांचा रोष ओढवून घेतला होता. महिन्याभरापूर्वी त्यांना पोलिस संरक्षणही देण्यात आले होते. पुरोगामी विचारांचे वारसदार असलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाली नसताना आता कलबुर्गी यांच्या रुपाने आणखी एका पुरोगामी विचारवंताची हत्या झाली आहे.