** गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटले तरी ओळख परेड नाही **
** तपास विश्रांतवाडी पोलिसांकडे वर्ग **
पिंपरी : रस्त्याने चालेल्या १९ वर्षीय तरूणीला वेश्याव्यवसाय करत असल्याचा संशायावरून दिघी पोलिसांनी बेदम मारहाण केली. याबाबत तरुणीने समाजसेविकामार्फत तक्रार केली होती. या घटनेनंतर तीन दिवसांनी संबंधित पोलिसांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करून तीन दिवस उलटले, तरी ओळख परेडच्या नावावर संबंधित पोलिसांची नावे उघड करण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत. दरम्यान या घटनेचा तपास विश्रांतवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांच्या संवेदनाशून्यतेचे दर्शन घडवणारा हा प्रकार सोमवारी आळंदी दिघी रस्त्यावर साईबाबा मंदिराजवळ घडला. १९ वर्षीय तरुणीला महिला व पुरुष पोलीस कर्मचार्याने वेश्याव्यवसाय करत असल्याच्या संशयावरून अडवले. जीपमध्ये बसवून अमानुष मारहाण केली. यामध्ये तरुणीच्या शरीरावर मारहाणीचे वळ उठले. त्यानंतर एका समाजसेविकेमार्फत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्याची चौकशी करून अखेर पोलिसांनी तीन दिवसांनी मारहाणीची ताक्रार दाखल केली. गुन्हा दखल करून तीन दिवस उलटल्या नंतरही अद्याप संबंधित पोलिसांवर कसलीही कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकांकडून पोलिस कर्मचार्यांना पाठराखण करीत असल्याचा चर्चा होत आहे. वरिष्ठ निरीक्षक नवनाथ घोगरे म्हणाले की, योग्य आणि निपक्षपाती तपास व्हावा यासाठी सदर तपास हिंजवडी पोलिसांकडे वर्ग केला असल्याचेही त्यांनी सांगितले, मात्र नावे ओपन करता येणार नाहीत.
गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झाल्यानंतरही पोलिसांची ओळख परेड झाली नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित पोलिसांची नावे उघडकीस करता येणार नसल्याची बचावात्मक भूमिका दिघी पोलिसांनी घेतली असल्याने कर्मचार्यांना वाचवण्याचे हे प्रकार चालले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.