* आमदार संदीप नाईक यांच्या मागणीनंतर विधान परिषदेच्या सभापतींचे निर्देश
* क्लस्टरबाबत ग्रामस्थांच्या सूचना ऐकण्यासाठी सिडकोची लवकरच बैठक
* टोल मुक्तीसाठी विचाराधिन यादीत ऐरोली टोलनाक्याचा समावेश
नवी मुंबई : नवी मुंबईच्या दिघा परिसरातील एमआयडीसीच्या जागेवर गरजेपोटी बांधण्यात आलेल्या बांधकामांना एमआयडीसीने नोटीसा बजावल्या आहेत. पूर्वी असलेल्या जुन्या चाळींच्या जागी बांधकामे झाली आहेत. येथील रहिवाशांनी कुठे जायचे? असा प्रश्न करीत आमदार संदीप नाईक यांनी या रहिवाशांची प्रथम पुनर्स्थापना करा, अशी मागणी केली आहे.
नवी मुंबईतील जिव्हाळ्याच्या प्रश्नी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना बैठक आयोजित करण्याची विनंती आमदार नाईक यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली होती. त्यानुसार आज ही बैठक विधानभवनात सभापती निंबाळकर यांच्या दालनात पार नगरविकास विभागाचे सचिव नितिन करीर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे, सिडकोच्या सह-व्यवस्थापकीय संचालिका व्ही राधा, अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्री मेनन, श्री राजपूत, एमएसआरडीसीचे श्री रामचंद्रन, एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश माळी आदी उच्चपदस्थ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवक अनंत सुतार, नगरसेवक नविन गवते, नगरसेविका अपर्णा गवते, नगरसेविका दिपा गवते, समाजसेवक राजेश गवते आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
एमआयडीसी भागातील गरजेपोटी बांधण्यात आलेल्या घरांना बजावलेल्या नोटीसा, प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेल्या बांधकामांना बजावण्यात आलेल्या नोटीसा, ऐरोली टोलनाका टोल फ्रि करणे याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
** रहिवाशांच्या पुनर्स्थापनेचा विचार करा..
दिघा भागातील रहिवाशांना दिलेल्या नोटीसा न्यायालयाच्या आदेशाने दिल्या असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता माळी यांनी दिली. न्यायालयात या प्रश्नी वस्तूस्थिती मांडून पुनर्विचार याचिका दाखल करावी तसेच या भागासाठी एसआरए योजना राबविता येईल काय? याविषयी चाचपणी करावी, असे निर्देश सभापती निंबाळकर यांनी बैठकीत दिले. या संदर्भात उद्योगमंत्री आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अभियंता यांची बैठक आयोजित करण्यात येईल, असेही सभापती निंबाळकर म्हणाले.
*** महापालिका कोर्टाला विनंती करणार…
दिघा भागात नवी मुंबई महापालिकेची एमआयडीसीच्या जागेत नागरी सुविधांच्या स्वरुपात शाळा, उद्याने अशा स्वरुपाची काही बांधकामे आहेत. या बांधकामांवर देखील कारवाईचा धोका आहे. पालिकेने या संदर्भात कोर्टाला विनंती करावी, कोर्टाकडून वेळ मागून घ्यावी, अशी सुचना आमदार नाईक यांनी पालिकेचे आयुक्त वाघमारे यांना केली. पालिकेच्या महासभेत ठराव करुन कोर्टाकडे म्हणणे मांडण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घ्यावा, अशी सुचना आमदार नाईक यांनी बैठकीत केली. नगरसेवकांची बैठक घेवून चर्चा केल्यानंतर कोर्टाकडे म्हणणे मांडावे, असे ते म्हणाले. या सुचनेवर कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त वाघमारे यांनी दिले.
*** क्लस्टरबाबत ग्रामस्थांशी बोलणार…
या बैठकीत सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्हि राधा यांनी नविन क्लस्टर योजनेविषयी एक दृकश्राव्य सादरीकरण केले. या क्लस्टरविषयी ग्रामस्थांच्या काही अडचणी आणि सुचना आहेत. त्या आपल्याला अवगत करावयाच्या आहेत. त्यामुळे या संदर्भात एक बैठक आपण आयोजित करावी, अशी सुचना आमदार संदीप नाईक यांनी व्ही राधा यांना केली. लवकरच अशाप्रकारची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन व्ही राधा यांनी आमदार नाईक यांना दिले.
*** टोल मुक्तीच्या यादीत ऐरोली टोल नाक्याचा समावेश
नवी मुंबईतील ऐरोली टोलनाका टोल फ्रि करावा, अशी मागणी नवी मुंबईकरांच्या वतीने मी सातत्याने केली आहे. राज्य शासनाने खारघर येथील टोल माफ केला मात्र नवी मुंबईकरांवर अन्याय केल्याचे आमदार नाईक म्हणाले. ऐरोली टोल नाका लवकरात लवकर टोलमुक्त करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यापूर्वी देखील शासनाने ऐरोली टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते मात्र ते पूर्ण केले नाही. आता मात्र याबाबत निश्चित स्वरुपात निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी केली. एमएसआरडीसीचे श्री रामचंद्रन यांनी आमदार नाईक यांच्या मागणीवर उत्तर दिले. मुंबईच्या एन्ट्री पाँइर्ंटचे सहा टोलनाके टोलफ्रि होणार आहेत. त्यामध्ये ऐरोली टोलनाक्याचा समावेश करु. या संदर्भात शासनाने अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांची समिती नेमलेली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर या संबंधीचा निर्णय घेण्यात येईल, असे रामचंद्रन यांनी नमूद केले.