तुर्भे / वार्ताहर
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेवून नेरूळ येथील तेरणा सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याची मागणी केली. तेरणा पब्लिक ट्रस्ट या संस्थेला नेरूळ सेक्टर २२ येथील भूखंड क्र. १२ हा भूखंड सिडकोकडून शैक्षणिक उद्दिष्टासाठी देण्यात आला असताना या भूखंडावर खासगीरुग्णालयाशी भागीदारी करून तेरणा सह्याद्री रुग्णालय अवैधरीत्या स्थापन केल्याचा आरोप मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी केला. तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णालयास परवानगी देताना कोणतीच कागदपत्रे तपासली नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना या संदर्भात आयुक्तासमोर विचारणा केली असता त्यांना याबाबत स्पष्टीकरण देता आले नाही. यावेळी आरोग्य विभागाच्या उपायुक्ताना मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी खडे बोल सुनावले व अशा बेजबाबदार अधिकार्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी आयुक्तांकडे केली. या प्रकरणात मोठा गैरव्यवहार असल्याचा संशय येत असुन संबंधीत रुग्णालयाची परवानगी रद्द करून त्यांच्यावर खोटी आणि अपूर्ण कागदपत्रे सदर केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या रुग्णालयास डोळे झाकपणे परवानगी देणार्या वैदयकीय आरोग्य अधिकार्याची चौकशी करून निलंबन करण्यात यावे अशी मागणी म्हात्रे यांनी केली. याप्रसंगी शिष्टमंडळात विद्यार्थी सेनेचे शहर सचिव निखिल गावडे, उपशहर अध्यक्ष सन्प्रित तुर्मेकर, संदेश डोंगरे, जितेश कायस्थ, प्रणेश सुद्रिक आदी उपस्थित होते .