नवी मुंबई : महानगरपालिका अभियांत्रिकी विभागाच्या वतीने कार्यरत अभिनव तक्रार निवारण प्रणालीच्या माध्यमातून रस्ते, खड्डे याविषयी नागरिकांच्या प्राप्त होणा-या तक्रारी, सूचना यावर तात्काळ कार्यवाही होत असल्याने व करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती नागरिकांना कळविली जात असल्याने नागरिकांकडून समाधानकारक व उत्तम कार्यप्रणाली असे अभिप्राय व्यक्त करण्यात येत आहेत.
नागरिकांना रस्त्यांविषयी असलेल्या तक्रारी महानगरपालिकेकडे सहजपणे पोहचविता याव्यात ही भूमिका नजरेसमोर ठेवून महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तक्रार निवारण प्रणाली 17 जुलैपासून कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती देत शहर अभियंता श्री. मोहन डगांवकर यांनी जागरुक नागरिकांकडून खड्ड्यांविषयीची माहिती मिळाल्याने त्यावर तत्पर कार्यवाही करणे शक्य होत असल्याचे सांगितले आहे.
ही प्रणाली चार पध्दतीने कार्यान्वित असून रस्त्यांबाबतच्या तक्रारी नोंदविण्याकरीता नागरिकांसाठी आठही विभाग कार्यालयात तक्रार नोंदवही ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सध्याचे मोबाईल वापरण्याचे मोठे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेमार्फत 8424949888 हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जागरूक नागरिकांमार्फत या मोबाईल क्रमांकावर रस्त्याच्या तक्रारींविषयी 5 एस.एम.एस. (Text Message) संदेश प्राप्त झाले असून त्यांचे निराकरण करण्यात आले आहे व संबंधितांना त्याची माहितीही देण्यात आली आहे.
या मोबाईल क्रमांकावर सध्याचा लोकप्रिय सोशल मिडिया व्हॉट्स ॲप प्रणालीचा वापर करून 39 नागरिकांनी रस्ते व खड्ड्यांच्या तक्रारी प्रत्यक्षदर्शी फोटोव्दारे पाठविल्या असून त्या तक्रारींचे निराकरण केल्यानंतर केलेल्या कार्यवाहीची माहितीही त्यांना प्रत्यक्षदर्शी फोटोव्दारेच पाठविली असल्याने नागरिकांकडून इतरांनीही अनुकरण करावे अशी कार्यप्रणाली अशा शब्दात या प्रणालीचे कौतुक करण्यात येत आहे.
याशिवाय नागरिकांना 1800222309 व 1800222310 या दोन टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधून आपल्या रस्त्यांविषयीच्या तक्रारी विनामूल्य नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध असून या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर 13 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी महानगरपालिकेशी संबंधित 7 तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात येऊन त्याची माहिती संबंधितांना कळविण्यात आलेली आहे. उर्वरीत 5 तक्रारी या सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, एम.आय.डी.सी. प्राधिकरणांशी संबंधित असल्याने त्यांचे निराकरण करण्याबाबत संबंधित प्राधिकरणांना सूचित करण्यात आले आहे.
याखेरीज नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website)www.nmmconline.com यावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या तक्रार निवारण संगणक प्रणाली (Public Grievance system) मध्येही नागरिक सेवानिहाय तसेच सेवेतील बाबींबाबत तक्रार नोंदवित असतात. अशाप्रकारे ऑनलाईन तक्रार नोंद केल्यानंतर तक्रारदारास संगणकीय तक्रार क्रमांक (Tokan No.) देण्यात येतो. या तक्रार क्रमांकानुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबतची माहिती व सद्यस्थिती नागरिक ऑनलाईन पध्दतीने ट्रॅक ग्रिव्हेन्स (Track Grievance) व्दारे पाहू शकतात. तक्रारीचे निवारण झाल्यानंतर नागरिकांना तक्रारीची सद्यस्थिती लगेच उपलब्ध होते. यामध्ये प्राप्त होणा-या सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच एम.आय.डी.सी. प्राधिकरणांच्या तक्रारींसाठी त्यांना या प्रणालीचा लॉगीन आय.डी. व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना दर्जेदार व प्रशस्त रस्ते उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामध्ये खड्डेविरहीत रस्ते ही संकल्पना साकारण्यासाठी महानगरपालिका कटीबध्द असून रस्त्यांबाबतच्या तक्रारींचे तात्काळ निवारण व्हावे याकरीता अभियांत्रिकी विभागाने सुरु केलेल्या चार प्रकारच्या तक्रार निवारण प्रणालींव्दारे स्वच्छ व सुंदर शहर निर्मितीमध्ये नागरिकांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन महापौर श्री. सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.