सिंधुदुर्ग/औरंगाबाद: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू झालाय. शिवाय रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. सोनवडेपार आणि नेरुर नदी किनार्यावरच्या दोन गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत सिंधुदुर्गातले असूनही जिल्ह्यात लोकांच्या आरोग्याची प्रचंड हेळसांड होतेय. गणपतीला मुंबईसह राज्यभरातून चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात जात असतात. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं तोंडवर काढलं असताना जिल्हा प्रशासन मात्र हालचाल करताना दिसत नाहीये. तर तिकडे औरंगाबाद शहरात स्वाईन फ्लूचा दुसरा बळी गेलाय. सिडको एन-४ इथल्या महिलेचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालाय.
पूनम हरिओम गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. धूत हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झालाय. स्वाईन फ्लूचा विळखा वाढत असताना महापालिका मात्र निद्रिस्त असल्याचं दिसून येतोय.