वाशी : तुर्भे एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तुर्भे एमआयडीसीतील शिवम हॉटेलवर छापा मारुन त्याठिकाणी लपवून ठेवण्यात आलेला तब्बल 2 लाख 42 हजार रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात हॉटेल मालकासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गुटखा अन्न-औषध प्रशासनाकडे पुढील तपासासाठी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी दिली.
तुर्भे एमआयडीसीतील टीटीसी इंडस्ट्रीयल भागातील शिवम हॉटेलमध्ये गुटख्याचा साठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलाश वाघ यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गत 29 ऑगस्ट रोजी शिवम हॉटेलवर छापा मारला. यावेळी पोलिसांना सदर ठिकाणी गुटख्याच्या 69 गोण्या भरुन ठेवण्यात आल्याचे आढळून आले. यात पोलिसांना तब्बल 2 लाख 42 हजार रुपये किंमतीचे केसर युक्त विमल पान मसाला व्हि-1च्युविंग टोबॅको, राजश्री पान मसाला, के.पी.ब्लॅक लेबर प्रिमीयम च्युविंग टोबॅको, तुलसी रॉयल जाफरानी जर्दा या प्रतिबंधित
गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थ आढळून आले.
त्यामुळे पोलिसांनी सदरचा गुटखा आणि तंबाख्ुजन्य पदार्थ जप्त करुन सदर गुटख्याचा साठा करुन ठेवणार्या संजय वैष्णव गिरी (31), मधुसुधन मुरलीधर सेनापती, गणेश सिबाप्रसाद साहु आणि हॉटेल मालक विरेंद्र आर दवे या चौघांवर अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार तसेच विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती चंद्रसेन देशमुख यांनी दिली. या कारवाईत जप्त करण्यात आलेला गुटखा आणि तबांखुजन्य पदार्थ अन्न—औषध प्रशासनाकडे पुढील तपासासाठी देण्यात आल्याचेही देशमुख यांनी सांगितले.