नवी मुंबई ः यंदा समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण केवळ ५५ टक्के भरले असून पुढील सहा महिने पुरेल इतके पाणी मोरबे धरणात शिल्लक राहिले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील जनतेवर पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, नवी मुंबई शहरात पाणी कपात करण्याची आवश्यकता असतानाही राजकीय दबावामुळे हतबल झालेले महापालिका प्रशासन पाणी कपात करण्याचे धाडस करत नसल्याचे चित्र दिसत आहे.
मोरबे धरणाची धरण वाहून जाण्याची पातळी ८८ मीटर इतकी आहे. यंदा जून महिन्यापासून धरण क्षेत्रात पाऊस सुरु झाला असला तरी ऑगस्ट महिना संपेपर्यंत म्हणावा तसा समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी फक्त ७८ मीटरपर्यंत झाली आहे. आतापर्यंत फक्त ५५ टक्केच धरण भरले आहे. मोरबे धरणातील सध्याचा पाणीसाठा नवी मुंबई शहराला येत्या मार्च महिन्यापर्यंत पुरणार आहे.
राज्यात दुष्काळाची स्थिती असताना नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी २४ तास पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात आवश्यकते पेक्षा जास्त पाणी वापरले जात आहे, असे खुद्द महापालिका प्रशासनही मान्य करत आहे. इतकेच नव्हे तर नवी मुंबई शहरात पाणी वितरणात पाणी चोरी आणि पाणी गळती देखील १९ टक्के असल्याने नुकतीच एक महापालिका महासभाही या विषयावर झाली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने अनेक ठिकाणी धाडी टाकून अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची, चोरी आणि जलवाहिनी दुरुस्तीच्या माध्यमातून होणारी पाण्याची गळती रोखण्याची धडक कारवाई सुरु केली आहे. त्याच जोडीला भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पाणी कपात करण्याची आवश्यकता असतांनाही राजकीय जोखडांमुळे पाणीकपात केली जात नसल्याचे चित्र नवी मुंबई शहरात आहे.
नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याची उधळपट्टी सुरु असताना पाणी कपात करण्याचा महापालिका अधिकार्यांचा मानस आहे. मात्र, राजकीय दबावामुळे महापालिका अधिकारी पाणी कपातीचा निर्णय घेतांना कच खात आहेत. याबाबत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे देखील खंबीर भूमिका घेण्यात कमी पडत असल्याची चर्चा महापालिका वतुळात होत आहे. मोरबे धरणातून दररोज ४५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा महापालिका आणि सिडको क्षेत्रासाठी केला जात आहे. पावसाळा फक्त एकच महिना राहिलेला असल्याने मोरबे धरण भरुन वाहण्याची शक्यता कमी आहे. चालू सप्टेंबर महिन्यात जर चांगला पाऊस झाला तर धरण समाधानकारक भरु शकते. अन्यथा धरणामध्ये आता जेवढा पाणीसाठा शिल्लक आहे, त्यातून नवी मुंबई शहराला फक्त येत्या मार्च महिन्यापर्यंत पाणीपुरवठा केला जाऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे.