नवी दिल्ली : कंडोमच्या जाहीरातीवरुन मला लक्ष्य करण्यापेक्षा सत्तेत बसलेल्यांनी गरजूंना मदत करण्यावर लक्ष द्यावे. सत्ता हाती असलेल्या व्यक्ती जेव्हा माझ्यावर त्यांचा वेळ आणि ऊर्जा खर्च करतात तेव्हा मला वाईट वाटते अशी प्रतिक्रिया सनी लिऑनने दिली आहे.
कम्युनिस्ट पक्षाचे नेते (सीपीआय) अतुल कुमार अंजन आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष बरखा सिंह यांनी सनी लिऑनला तिच्या कंडोमच्या जाहीरातीवरुन लक्ष्य केले होते.
सनीच्या कंडोम जाहीरातीमुळे देशात बलात्कार वाढत असल्याचे विधान अंजन यांनी केले होते, तर सनीची जाहीरात अनैतिक असून तिचे प्रक्षेपण तात्काळ थांबवावे अशी मागणी बरखा सिंह यांनी केली होती. टीकाकारांचा समाचार घेताना सनी लिऑनने राजकारण्यांना माझ्यावर वेळ खर्च करण्यापेक्षा गरजवंतांची मदत करा असा सल्ला दिला आहे.