नाशिक : राज्यातील दुष्काळाच्या पाहणी दौर्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांचा शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतला.
नाशिक दौ-यावर आलेल्या राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस दोघांवर जोरदार टीका केली. दुष्काळाची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र सरकारने दुष्काळी भागांचे पाहणी दौरे करत बसण्यापेक्षा शेतकर्याला सध्या ज्या गोष्टींची गरज आहे ती मदत तात्काळ त्याला उपलब्ध करुन द्यावी असे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारला अद्यापही प्रशासनावर पूर्ण पकड बसवता आली नसल्याची टीका त्यांनी केली. त्याचवेळी दुष्काळावरुन मराठवाड्यात १४ सप्टेंबरपासून जेलभरो आंदोलनाची हाक देणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही त्यांनी समाचार घेतला.
पंधरावर्ष सत्ता हातात असताना राष्ट्रवादीने सिंचन प्रकल्प पूर्ण केले असते तर, आज ही वेळच आली नसती. त्यामुळे त्यांना दुष्काळाच्या विषयावर बोलण्याचा, आंदोलन करण्याचा काही एक अधिकार नाही असे राज म्हणाले. वनौषधी उद्यानाच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.