* नव्या स्वरूपातील ठाणे टाऊन हॉल
* खुल्या प्रेक्षागृहाचे लोकार्पण
* ठाणे मेट्रोचे या वर्षभरात भूमिपूजन
ठाणे : मुंबईलगतच्या ठाणे शहराचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी शासन संवेदनशीलअसून शक्यतो या वर्षभरातच ठाणे मेट्रोचे भूमिपूजन करण्यात येईल तसेच हे काम मुंबई मेट्रो प्रमाणे न रेंगाळू देता निश्चित वेळेत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या टाऊन हॉल व खुल्या प्रेक्षागृहाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.
कोणत्याही शहरातील टाऊन हॉल हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा साक्षीदार असतो. ठाण्यातील हा टाऊन हॉल देखील सामाजिक, राजकीय परिवर्तनाची नांदी ठरेल असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
** इमारतींचा पुनर्विकास : मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, ठाणे शहरातील अनधिकृत व अधिकृत मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी ०.३३ इतका एफ.एस.आय देण्यासाठी शासन अनुकूल असून इम्पॅक्ट सेसमेंट तयार आहे. याबाबत राज्य शासन लवकरच निर्णय घेईल आणि हा प्रकल्प राज्यातील इतर शहरांसाठी देखिल पथदर्शी म्हणून राबविण्यात येईल.यामुळे सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधणे शक्य होईल.
** उत्सवात राजकारण आणू नये :
कोणत्याही उत्सवात राजकारण आणू नये असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ठाणे, मुंबई ही शहरे सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच पुढे असतात. आपल्या संस्कृतीत दहीहंडीला विशेष महत्व आहे. सामाजिक व सांस्कृतिक अभिसरणात या उत्सवांना अधिक महत्व असून असे उत्सव पारंपारिक पध्दतीने, कायद्याच्या चौकटीत बसवून साजरे करण्यास कुणी अडवलेले नाही. परंतु असे उत्सव साजरे करू नका अशा धमक्या जर कुणी देत असतील तर पोलीस योग्य ती कार्यवाही करतील असेही ते म्हणाले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलतांना म्हणाले की, या अडगळीत पडलेल्या वास्तूला जिल्हाधिकारी कार्यालयाने नवीन रूप देऊन या वास्तूला वैभव प्राप्त करून दिले आहे. ठाणे हे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर असून याठिकाणी कलावंताना, कला रसिकांना या वास्तूचा उपयोग करण्याची संधी मिळणार आहे. ठाण्यासाठी क्लस्टरची योजना प्राधान्याने राबविण्यासाठी राज्य शासनाने पाऊले उचलावीत, यात मोडकळीस आलेल्या अनधिकृत इमारतीबरोबरच अधिकृत इमारतीचा समावेश करून रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. मेंटल हॉस्पिटलला खूप मोठी जागा असून विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकासाठी १० एकर जागा दिल्यास ठाण्यातील गर्दीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात या टाऊन हॉलच्या पुनरुज्जीवनामागची भूमिका सांगितली. यावेळी आमदार संजय केळकर यांच्या आवाजातील मी टाऊन हॉल बोलतोय ही ध्वनिमुद्रिका वाजवण्यात आली. केळकर यांनी या टाऊन हॉलच्या पुनार्निर्माणासाठी प्रयत्न केला होता. त्यांच्या आमदार निधीतून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.