घणसोली / वार्ताहर
वाशी, सेक्टर-१७ मधील श्रीजी मोबाईल शॉप या दुकानावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील चौघा लुटारुंना वाशी पोलिसांनी सापळा लावून अटक करण्याची कारवाई ४ सप्टेंबर रोजी पहाटे केली. या कारवाईदरम्यान या टोळीतील एक लुटारु पळून जाण्यात यशस्वी झाला असून पोलिसांनी आता त्याचा शोध सुरु केला आहे. पकडलेल्या चौकडीकडून पोलिसांनी तलवार, चॉपरसह दरोड्यासाठी लागणारी हत्यारे जप्त केली आहेत.
वाशी, सेक्टर-१७ मधील श्रीजी मोबाईल शॉप जवळ एक टोळी दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने ४ सप्टेंबर रोजी पहाटे ३ च्या सुमारास सदर भागात सापळा लावला होता. यावेळी सदर ठिकाणी पांढर्या रंगाच्या कारमधून आलेल्या टोळीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्या सर्वांची धरपकड केली. यावेळी एक लुटारु पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, दादासाहेब गुळेकर (२५), अजय कळसे (१९), सुदर्शन पवार आणि दिपक तोडकर (२२) असे चौघे जण पोलिसांच्या हाती लागले. यावेळी पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याजवळ तलवार, चॉपर, मिरची पूड, दोर आणि दरोड्यासाठी लागणारे इतर शस्रे आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी श्रीजी मोबाईल शॉपवर दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी चौघांना अटक करुन पळून गेलेल्या त्यांच्या साथीदाराचा शोध सुरु केला आहे.