नवी दिल्ली : कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी टिव्ही अँकर अमृता रायसोबत विवाहबद्ध झाल्याची बातमी आहे. इंडियन एक्सप्रेसमधील बातमीनुसार अमृता आणि दिग्विजय यांनी गेल्या महिन्यातच चेन्नईमध्ये विवाह केला. गेल्यावर्षी त्यांचे खाजगी फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह सध्या अमेरिकेत असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिग्विजय सिंहांच्या जवळच्यांनी या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलंय.
राज्यसभा टिव्हीमध्ये अँकर असलेल्या अमृता रायकडून अद्याप याबाबत काहीही वक्तव्य आलेलं नाही. सध्या अमृता राय सुट्टीवर असल्याचं कळतंय.
दिग्विजय सिंह यांनी एप्रिल २०१४मध्ये अमृता सोबतचे त्यांचे खाजगी फोटो लीक झाल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल कबुली दिली होती. त्यांनी ट्विटरवर लिहिलं होतं, ’अमृता आणि तिच्या पतीनं सामंजस्यानं घटस्फोटासाठी अर्ज केलाय. जसा याबाबत निर्णय होईल आम्ही आमच्या नात्याला औपचारिक नाव देऊ.’
त्यानंतर अमृता राय यांनीही ट्विटरवर लिहिलं होतं, ’मी माझ्या पतीसोबत वेगळी झालीय आणि सामंजस्यानी आम्ही घटस्फोट घेणार आहोत.त्यानंतर मी दिग्विजय सिंहांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.’
दीर्घ आजारानंतर दिग्विजय सिंहांच्या पत्नीचं २०१३मध्ये निधन झालं. दिग्विजय सिंह यांना चार मुली आणि एक मुलगा आहे.