घणसोली ः देशातील फेरीवाला विक्रेत्यांसाठी भारत सरकारने पथविक्रेता (आजीविका का संरक्षण और पथ विक्रय का विनियमन) कायदा (अधिनियम
२०१४) लागू केला आहे. या कायद्याची नवी मुंबई महापालिका प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीची तड लावण्यासाठी नवी मुंबईतील विविध फेरीवाला संघटना आणि युनियन यांनी एकत्र येऊन ‘नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समिती’च्या नेतृत्वाखाली महापालिका तुर्भे
वॉर्ड ऑफीसवर नुकताच फेरीवाल्यांचा भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चामुळे फेरीवाल्यांवरील कारवाईचा मुद्दा पुन्हा एकवार एैरणीवर आला आहे.
फेरीवाला कायद्याची त्वरीत अंमलबजावणी सुरु करुन महापालिकेने फेरीवाल्यांवरील कार्यवाही त्वरीत थांबवली नाही तर यापुढे महापालिकेविरुध्द तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ‘नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समिती’चे सचिव बाळकृष्ण खोपडे यांनी महापालिकेला दिला.
पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी महापालिकेने त्वरीत न केल्यास यापुढे महापालिकेविरुध्द तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय फेरीवाल्यांच्या सभेत घेण्यात आला आहे, असे बाळकृष्ण खोपडे यांनी सांगितले.
नवी मुंबईतील फेरीवाल्यांचे ते व्यवसाय करत असलेल्या ठिकाणचे सर्व्हेक्षण करुन फेरीवाल्यांना विनाविलंब त्यांच्या उपजिविकेसाठी फेरीवाला व्यवसाय परवाना देण्यात यावा, शहर फेरीवाला समितीप्रमाणेच प्रभाग फेरीवाला समिती तयार करण्यात यावी, फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण करताना पक्षपातीपणा करण्यात येवू नये, महापालिका अतिक्रमण विभागाच्या आणि पोलिसांच्या फेरीवाल्यावरील कारवाया फेरीवाल कायद्याच्या तरतुदीनुसार त्वरीत थांबवण्यात याव्यात, गोरगरीब फेरीवाल्यांचे जप्त केलेले महापालिकेने ७२ तासाच्या आत परत करावे, महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतर फेरीवाल्यांच्या मालाची नासधुस केल्यास त्याची भरपाई महापालिकेने द्यावी, फेरीवाले व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणी महापालिकेने प्राथमिक वैद्यकीय प्राथमिक सुविधा पुरवाव्यात, आदी मागण्या ‘नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समिती’तर्फे महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई महापालिका उपायुक्त (अतिक्रमण) अंकुश चव्हाण आणि तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्विकारले. महापालिका उपायुक्त अंकुश चव्हाण यांच्या सकारात्मक मध्यस्थीनंतर फेरीवाल्यांनी मोर्चा स्थगित केला.
फेरीवाल्यांच्या मोर्चामध्ये फेरीवाला प्रतिनिधी विनीता बाळेकुंद्री, रत्ना माने, जयसिंग रणदिवे, शिवाजी जाधव, देवेंद्र कदम, उषा ढवरे, महेश पाटील यांच्यासह असंघटीत श्रमिक पंचायत, शिवशक्ती फेरीवाला युनियन, नेरुळ रोज बाजार व्यापारी सेवा संस्था, कामगार एकता युनियन, नवी मुंबई श्रमिक फेरीवाला संघटना, जीवन आधार फेरीवाला संघ, युवा शक्ती फेरीवाला संघटना या संघटनांचे सदस्य असलेले फेरीवाले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.