मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने चर्चगेटकडे येणार्या लोकलचा खोळंबा झाल्याची आगाऊ सूचना न दिल्याने रविवारी मेगाब्लॉकच्या दिवशी रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल झाले.
दुरुस्तीच्या कामानिमित्त पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान रविवारी सकाळी 10.35 ते 3.35 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला. मात्र या दरम्यान जलद मार्गावरुन काही गाड्या धावत होत्या.
रविवारी अधिकतर नोकरदार वर्गाला रजा असते. नोकरदार वर्गाला पश्चिम रेल्वेच्या अनागोंदी कारभाराची सवय असल्याने ते नेहमीच गर्दीच्या वेळेत कसा तरी खडतर प्रवास करतात. या ढिसाळ कारभाराची माहिती कधी तरी प्रवास करणार्या प्रवाशांना नसते. त्यामुळे अशा प्रवाशांची मग एकच तारांबळ उडते आणि रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा फटका सहन करावा लागतो.
रविवारी परिवारासह बाहेर फिरण्यासाठी निघालेल्या अन्य प्रवाशांची रेल्वे लोकलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यातच आज दहीहंडी पहाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणावर होती.
रविवारी दुपारी मेगाब्लॉक, त्यात पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी कुठलीही आगाऊ सूचना दिली गेली नाही. अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली होती. मात्र या कालावधीत अनेक लोकल उशिराने धावत होत्या. तर अनेक लोकल आगाऊ सूचना न देता रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. उशिरा धावणारी लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडत होती. एकूणच मेगाब्लॉक त्यातच रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे प्रवाशांना हाल झाले.
दादर स्थानकात तर दुपारी दोन वाजल्यापासून पावणे तीन वाजेपर्यंत एकही धिम्या मार्गावरील चर्चगेटकडे जाणारी एकही लोकल न आल्याने प्रवाशांनी फलाट तुडूंब भरले होते. दुपारी दोन वाजता दादर येथे चर्चगेटकडे जाणारी 2.26 ची लोकल इंडिकेटर दर्शवण्यात आली होती. मात्र 2.40 वाजता सदर लोकल आता अंधेरी स्थानकातून सुटली असल्याचे घोषित करण्यात आले. यामुळे काही प्रवाशांनी पुन्हा जलद लोकल पकडण्यासाठी पुलावर जाण्यासाठी घाई केली असता प्रचंड घोंधळ उडाला. यात महिला, लहान मुले आणि वृद्ध यांचे प्रचंड हाल झाले.