नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्ंगत येणार्या तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तुर्भे पोलीस ठाणे तर तुर्भे पोलीस ठाण्याचे सानपाडा पोलीस ठाणे असे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही पोलीस ठाण्यांचा पुढील कारभार आता याच नावाने चालणार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबई शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन राज्याच्या गृह विभागाने दोन वर्षापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्ंगत येणार्या तुर्भे पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस ठाण्यात विभाजन केले होते. एमआयडीसी भागासाठी खास तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे तर उर्वरित सानपाडा आणि जुईनगर विभागासाठी तुर्भे पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तुर्भे पोलीस ठाण्यातर्ंगत तुर्भ्यातील काहीच भाग येत नसल्याचे निदर्शनास आल्याने आताच्या तुर्भे पोलीस ठाण्याचे नाव बदलून त्याचे सानपाडा पोलीस ठाणे करण्यात आले आहे. तर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे नाव पूर्वीप्रमाणेच तुर्भे पोलीस ठाणे असे नाव करण्यात आले आहे. त्यामुळे या पुढील काळात सदर दोन पोलीस ठाण्यांचा कारभार सानपाडा पोलीस ठाणे आणि तुर्भे पोलीस ठाणे या नावाने चालणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.