मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील तीन्ही मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्याम राय यांच्या पोलिस कोठडीत सात सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
या तिघांना शनिवारी मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या तिघांवर शीनाच्या हत्येचा आरोप आहे. स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांच्यावर संशयाची सुई कायम असून, त्यांना अद्याप क्लनी चीट दिली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पीटर मुखर्जींचा अद्याप आरोपींमध्ये समावेश केलेला नाही. मात्र शुक्रवारी सलग तिसर्या दिवशी त्यांची खार पोलिस स्थानकात कसून चौकशी करण्यात आली. पोलिस इंद्राणी आणि पीटरच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहे.
शीनाचा मृतदेह रायगडला नेण्यासाठी जी गाडी वापरण्यात आली ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शीनाच्या मृत्यूनंतर इंद्राणीच्या कंपनीतील एक कर्मचार्याने शीनाच्या नावे ई-मेल पाठवल्याची माहिती सुध्दा पोलिसांना मिळाली आहे.
इंद्राणी आणि संजीव खन्नाची मुलगी विधी मुखर्जीचीही पोलिसांनी शुक्रवारी चौकशी केली. गुरुवारी पोलिसांनी इंद्राणीने शीनाची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केल्याचा दावा केला होता.