नवी दिल्ली – भारतामधील बिबट्यांची प्रथमच गणना करण्यात आली असून ही संख्या सुमारे १२ ते १४ हजार यांमधील असल्याचे सूत्रांनी आज (सोमवार) सांगितले. बिबट्या हा देशातील सर्वाधिक संख्या असलेला शिकारी प्राणी आहे.
गेल्या वर्षी करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेची पद्धत वापरुनच बिबट्यांची गणनाही करण्यात आली. या पद्धतीनुसार बिबट्यांचे छायाचित्रण, त्यांच्या अस्तित्वाचा इतर पुरावा संकलित करण्यात आला. व्याघ्रगणनेच्या मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ यादवेंद्रदेव व्ही. झाला यांच्या नेतृत्वाखाली ही गणना करण्यात आली. या गणनेमुळे देशाच्या विविध भागांत विखुरलेल्या बिबट्यांची विस्तृत माहिती उपलब्ध झाली आहे. शिवालिक टेकड्या, उत्तर व मध्य भारत व पश्चिम घाटाचा अंतर्भाव असलेल्या; सुमारे साडेतीन लाख किमी क्षेत्रफळ असलेल्या भागाचा अभ्यास या मोहिमेदरम्यान करण्यात आला.
सर्व प्रकारच्या वनक्षेत्राचा समावेश असलेल्या या अभ्यास मोहिमेमध्ये १,६४७ बिबट्यांची १७,१४३ छायाचित्रे गोळा करण्यात आली. या अभ्यासानंतर आढळून आलेल्या निष्कर्षांनुसार, भारतामधील बिबट्यांची संख्या उत्तम असल्याचे झाला यांनी सांगितले.