वाशी : नवी मुंबईची आधुनिक शहराप्रमाणेच विविध उपक्रमांतून सांस्कृतिक शहर म्हणून ओळख रुजत असताना शहरात साजरा होणार्या श्रीगणेशोत्सवातून अनेक मंडळे सेवाभावी काम करताना दिसतात. जनजागृतीपर संदेश देणार्या देखाव्यांतून सामाजिक भावना जपण्याबरोबरच अनेक मंडळे गरजू व्यक्तींना मदत तसेच आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण यासारख्या सामाजिक कामांमध्ये सक्रीय सहभागी असलेले दिसतात. अशा सामाजिक बांधिलकी जपत काम करणार्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहीत करण्यासाठी दरवर्षी नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा आयोजित करण्यात येत असते.
यावर्षीच्या गणेशोत्सवाची पुर्वतयारी सुरु झाली असताना मागील वर्षीच्या नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा 2014 चा पारितोषिक वितरण समारंभ तसेच त्यासोबत राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविणार्या नवी मुंबईकर 43 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती वितरण समारंभ 10 सप्टेंबर 2015 रोजी सायं. 5 वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे माजी मंत्री श्री. गणेश नाईक यांच्या हस्ते, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खा. राजन विचारे, ऐरोली विधानसभा सदस्य आ. संदीप नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आ.सौ. मंदा म्हात्रे आदी मान्यवर मुख्य अतिथी म्हणून तसेच उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समितीच्या सभापती सौ. नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेता जयवंत सुतार, विरोधीपक्ष नेता विजय चौगुले, परिवहन समिती सभापती साबु डॅनिअल हे प्रमुख अतिथी म्हणून आणि सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
श्रीगणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहित करण्यासाठी व उत्सव आयोजनामधून सामाजिक एकात्मतेची भावना वाढीस लागावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक वर्षी नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. यावर्षीही 17 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2015 या कालावधीत संपन्न होणार्या श्रीगणेशोत्सवानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून संस्था / मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत ज्या महानगरपालिका विभाग कार्यालय हद्दीत उत्सव साजरा होत आहे त्या विभाग कार्यालयात उपलब्ध असलेले श्रीगणेशदर्शन स्पर्धेचे प्रवेशअर्ज तेथेच दाखल करावयाचे आहेत.
स्पर्धा सहभागाकरीता श्रीगणेशोत्सव साजरा करणार्या संस्था / मंडळांची नोंदणी मा. धर्मादाय आयुक्त यांचेकडे झालेली असणे आवश्यक असून अर्जासोबत सदर नोंदणी / प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत जोडावयाची आहे. श्रीगणेशोत्सवासाठी नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस, अग्निशमन, एम.एस.इ.डी.सी. अशा सर्व विभागांची रितसर परवानगी असणे आवश्यक आहे. अधिकृत वीज कनेक्शन घेणे, ध्वनीमर्यादा सांभाळून ध्वनीक्षेपक वापर करणे, सुरक्षा साधनांचा वापर करणे तसेच कायदा व सुव्यवस्था विषयक सर्व बाबींचे पालन करणे आवश्यक आहे. श्रीगणेशोत्सवातील देखाव्यांतून सामाजिक सलोखा वाढावा तसेच सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी अशाप्रकारे सादरीकरण असावे.
विविध क्षेत्रातील त्रयस्थ मान्यवर व्यक्तींकडून स्पर्धा परीक्षण करण्यात येत असून परीक्षण करताना सजावट / देखाव्यातील कलात्मकता, त्यामधील समाजप्रबोधनात्मक / जनजागृतीपर संदेशाची मांडणी, परिसर स्वच्छता व टापटीप, शिस्तबध्दता, निधी विनियोगाची पध्दती, उत्सवात सादर होणारे शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, रोषणाई – सजावट व इतर बाबींमध्ये जाणवणारे वेगळेपण अशा विविध गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत. स्पर्धा परीक्षण करताना कलात्मकतेसोबतच उत्सव सादरीकरणाच्या उद्देशाचेही प्रामुख्याने विचार करण्यात येईल.
वरील निकषांच्या अनुषंगाने परीक्षण करुन स्पर्धेकरीता संपूर्ण महापालिका क्षेत्रातून सर्वोत्कृष्ट 5 गणेशोत्सव मंडळे निवडण्यात येणार असून त्यासोबतच आकर्षक देखावा, समाजप्रबोधनात्मक विषयानुरुप सजावट, उत्कृष्ट मुर्ती, स्वच्छता व शिस्तबध्दता अशा विभागांतर्गत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना स्वतंत्र पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी दि. 10 सप्टेंबर रोजी सायं. 5.00 वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेशदर्शन स्पर्धा 2014 च्या पारितोषिक वितरण समारंभासाठी पदाधिकारी व सदस्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तसेच नजिकच्या विभाग कार्यालयात यावर्षीच्या गणेशदर्शन स्पर्धेचे प्रवेशअर्ज भरुन स्पर्धा सहभाग नोंदवावा असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. प्रकाश मोरे व उपसभापती सौ. तनुजा मढवी यांनी केले आहे.