नवी मुंबई : महापालिकेच्या अर्थकारणाच्या तिजोरी चाव्या महिला सभापतींकडे सोपविण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने अंमलात आणला असला तरी शिरवणेच्या ‘दादूसगिरी’ने महिला सभापती गांगरल्याचे मंगळवारी स्थायी समितीच्या कामकाजात स्पष्टपणे पहावयास मिळाले.
महापालिकेच्या पहिल्या तीन सभागृहात महापालिका कामकाजात आक्रमकपणे आपल्या कामकाजाचा ठसा उमटवत जयवंत सुतारांनी आपली आगळीवेगळी छाप निर्माण केली आहे. चौथ्या सभागृहातही जयवंत सुतारांची उणिवही राष्ट्रवादी कॉंग्रेसला सातत्याने भासली. सत्ताधार्यांना अडचणीत आणणार्या विरोधी पक्षांवर अकुंश ठेवण्याची कामगिरी जयवंत सुतारांनी अनेकदा बजाविली आहे.
मंगळवारी महापालिका मुख्यालयात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षाचे नगरसेवक त्यांच्या प्रभागातील समस्या पोटतिडकीने मांडत असताना सभापती नेत्रा शिर्के यांनी त्यांच्याकडे लक्ष न देता आमच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे, असा उंची आवाजात सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक जयवंत सुतार यांनी सभापती नेत्रा शिर्केनाच दम दिल्याची घटना घडली. कामकाजादरम्यान अचानक शिरवणेच्या आक्रमक ‘दादूसगिरी’ने यावेळी सभापती नेत्रा शिर्के काही काळ गांगरुन गेल्या. ‘दादूस’च्या माध्यमातून जणुकाही पक्षप्रमुखांनीच आपणास आदेश दिला असे मानून सभापती नेत्रा शिर्के यांनी विरोधकांच्या म्हण्याकडे दुर्लक्ष करीत झालेल्या गोंधळात विषय मंजुरीला टाकून पक्षीय बळावर ते मंजूर करवून घेतले.
स्थायी समिती बैठकीत दप्तर खरेदीच्या प्रस्तवाला मंजुरी देण्याचा विषय होता. त्यावेळी सानपाड्यातील शिवसेना नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर यांनी त्यांच्या प्रभागातील शाळेच्या इमारतीवर वाढीव मजला बांधण्याची निविदा होऊनही स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जात नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर सभापती नेत्रा शिर्के यांनी याबाबत संबंधित महापालिका अधिकार्यांकडून माहिती मिळाल्यावर त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र, या उत्तराने नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सदर प्रस्ताव कधी आणणार आणि पुढील बैठकीत न आल्यास आपण जमिनीवर बसून निषेध करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेनेच्या कोमल वास्कर यांचे बोलणे चालू असतांनाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक तथा सभागृह नेते जयवंत सुतार मध्येच बोलण्यास उठले. सभापतींनीही त्यांना बोलण्याची परवानगी दिली. त्यामुळे वास्कर या उभ्याच राहिल्याने विरोधी पक्षाचे सर्वच सदस्य त्यांना पाठिंबा देण्यासाठी उभे राहिले. अशाप्रकारे विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रकार होत असल्याची टिका यावेळी विरोधी पक्षाने सभागृहात केली. एकीकडे जयवंत सुतार बोलत होते, तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे नगरसेवक बोलत होते. सदरचा गोंधळ थांबविण्याची विनंती सभापती नेत्रा शिर्के विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना करत असतानाच अचानक जयवंत सुतार यांनी मोठ्या आवाजाने ‘तुम्ही त्यांच्याकडे काय लक्ष देता, माझ्याकडे लक्ष द्या,’ असा दम भरला. यामुळे गांगरुन गेलेल्या सभापती नेत्रा शिर्के यांनी विरोधकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत गोंधळात कोट्यवधी रुपये खर्चाचे विषय मंजुरीला टाकून पक्षीय बळावर ते मंजूर करवून घेतले. याप्रकरणी विरोधी पक्षांनी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’च्या हुकूमशाहीचा निषेध केला.