नवी मुंबई : बुधवारी (दि. ९ सप्टेंबर) महापालिका मुख्यालयात विरोधी पक्ष व सत्ताधार्यांदरम्यान कामकाजावरून गोंधळ सुरू असताना शिवसेना नगरसेवक एम.के.मढवी यांनी ‘कबुतर आले रे ऽऽऽ’ असे वक्तव्य केल्याने सभागृहात तसेच पत्रकार कक्षात आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये हास्याचे फवारे उमटले.
महापौर सुधारकर सोनवणे हे महापालिका सभागृहातील ज्येष्ठ नगरसेवक असून महापालिका कामकाजाची त्यांना इंत्यभूत माहिती आहे. महापौरपदी सुधाकर सोनवणे आल्यावर कामकाजादरम्यान विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी व्यापक प्रमाणावर मिळत आहे. चर्चेदरम्यानच्या बातम्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना व्यापक प्रसिध्दी गेल्या काही महिन्यापासून मिळत असल्याने सत्ताधारी पक्षाच्या महापालिका सभागृहातील काही घटकांना ही बाब सातत्याने खटकत आहे. त्यातूनच विरोधी पक्षाचे सदस्य आपले म्हणणे मांडत असतानाच अथवा म्हणणे मांडण्याची परवानगी मागत असतानाच सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातून महापौर सुधाकर सोनवणेंना चिठ्ठी पाठविली जात असते. आज असाच गोंधळ सुरू असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका मातब्बर सदस्यांकडून महापौर सुधाकर सोनवणेंना चिठ्ठी पाठविण्यात आली. त्यावर शिवसेनेचे ऐरोलीतील नगरसेवक एम.के.मढवी यांनी कबुतर आले रे असे उपहासात्मक वक्तव्य काढले. एम.के.मढवी यांच्या वक्तव्याने महापौरांना पाठविण्यात येणार्या चिठ्ठी प्रकरणाची लक्तरे उजेडात आल्याने महापालिका सभागृहात, पत्रकार कक्षात आणि प्रेक्षक गॅलरीत हास्याचे कांरजे फुललेले पहावयास मिळाले.