सुजित शिंदे : ७७१८०३६००७
वाशी ः महाराष्ट्र राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मुलींचे विवाह (कन्यादान) करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या शिवसेनाप्रमुख कन्यादान योजनेला ‘नवी मुंबई शिवसेना’तर्फे येत्या दिवाळीपर्यंत २१ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तसेच नवी मुंबई शहरात साजरे होणारे शिवसेना पुरस्कृत श्रीगणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव यंदा काटकसरीने साजरे करुन ती रक्कमही या योजनेकडे वळविण्यात येणार आहे, अशी घोषणा नवी मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली आहे.
शिवसेनाप्रमुख कन्यादान योजनेसाठी नवी मुंबई महापालिकेतील सर्व शिवसेना नगरसेवक आणि परिवहन समिती सदस्य आपले एक महिन्याचे मानधन जमा करणार आहेत. या याजनेसाठी नवी मुंबईतून पाच लाख रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध केला जाणार आहे.
ऐरोली येथील सुनील चौगुले स्पोर्टस क्लबवर शिवसेनेच्या माध्यमातून मोठा नवरात्रौत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा सदर नवरात्रउत्सव काटकसरीने साजरा करुन सजावटीवर खर्च होणारे पाच लाख रुपये देखील शिवसेनाप्रमुख कन्यादान योजनेसाठी देण्यात येणार आहेत. दिवाळीपर्यंत या योजनेसाठी २१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्धार नवी मुंबई शिवसेनेने केला आहे, अशी माहितीही विजय चौगुले यांनी दिली.