कोलकाता- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया (७५) यांचे रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर कोलकाता येथील बिर्ला रूग्णालयात उपचार सुरु होते.
गेल्या काही दिवसांपासून जगमोहन दालमिया यांची प्रकृती नाजूक होती. अखेर गुरुवारी रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने दालमिया यांना येथील बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती.
अखेर रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. १९७९ साली बीसीसीआयमध्ये प्रवेश केलेले दालमिया १९८३ साली पहिल्यांदा बीसीसीआयचे खजिनदार बनले होते. त्यानंतर त्यांनी अनेकदा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले. तसेच १९९७ ते २००० अशी तीन वर्षे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचेही अध्यक्षपद भूषवले होते.
२००५ मध्ये त्यांच्यावर वादग्रस्त आरोप झाल्याने त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. मात्र हे आरोप सिद्ध न होऊ शकल्याने मार्च २०१५ मध्ये दहा वर्षानंतर ते पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते. त्यांच्या निधनाने क्रिकेटजगतातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.