कुंटूब चालविण्यासाठी प्रत्येक कुटूंबाला कुटूंबप्रमुख हा असावाच लागतो. राजकारणातही तीच संकल्पना महत्वाची असते. ज्या पक्षाचा त्या त्या भागातील प्रमुख माणूस महत्वाची भूमिका बजावीत असतो. ज्या पक्षाची संघटना खिळखिळीत असते, त्या पक्षाला राजकारणात वाटचाल करताना अडथळ्याची मालिका पार करावी लागते. नवी मुंबईमध्ये अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसैनिकांची तसेच शिवसेनेला मानणार्या लोकांची संख्या अधिक आहे. महापालिका स्थापनेनंतर नवी मुंबई शहराला तीन महापौर शिवसेनेने दिले. त्यानंतर महापालिका सभागृहात शिवसेनेची अधोगती सुरू झाली. दुसर्या व तिसर्या सभागृहात शिवसेनेला साधे विरोधी पक्षनेतेपदही मिळविता आले. चौथ्या सभागृहात शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. मनोज हळदणकर, विजयानंद माने, दिलीप घोडेकर, सरोज पाटील अशी स्थानिक भागातील मातब्बर मंडळी विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाली असली तरी महापालिका प्रशासनावर तसेच सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर दबाव निर्माण करण्यात या मंडळींना मर्यादा पडल्या. त्यामुळे सभागृहात विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेचे फारसे उपद्रवमूल्य निर्माण झालेच नाही. पाचव्या सभागृहाकरता झालेल्या महापालिका निवडणूकांमध्ये शिवसेनेचीच सत्ता येणार असे राजकीय वातावरण निर्माण झाले होते. नामदेव भगत, एम.के.मढवी, किशोर पाटकर यासह अनेक मातब्बरांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद वाढीस लागली होती. पण युतीची माशी शिंकली. स्वबळावर सत्तेवर येण्याची क्षमता असणार्या शिवसेनेला पुन्हा एकवार विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावे लागले. शिवसेनेने महापालिका निवडणूका जिल्हाप्रमुखाविना लढल्या. खासदार राजन विचारे, पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने महापालिका निवडणूक लढविली. तत्कालीन जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्यावर त्या काळात काही आरोप झाल्याने त्यांना जिल्हाप्रमुखपद सोडावे लागले. त्यानंतर शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरेंनी अद्यापि नवी मुंबई जिल्हाप्रमुखपदाचा निर्णय घेतलेला नाही. जिल्हाप्रमुखपदाकरता शिवसैनिकांमध्ये विजय चौगुले, ऍड. मनोहर गायखे, नामदेव भगत, विठ्ठल मोरे यांच्यासह अन्य नावांची चर्चा होत असली तरी प्रामुख्यांने या चारच नावांमध्ये खरी स्पर्धा असल्याचे शिवसैनिकांमध्ये बोलले जात आहे. उपनेते विजय नाहटा यांच्याही नावाची काही काळ जिल्हाप्रमुखपदाकरता चर्चा सुरू असली तरी उपनेते पद सोडून जिल्हाप्रमुख पदावर त्यांना काम करण्यास शिवसेना नेतृत्व सांगण्याची सुतरामही शक्यता नाही. विजय चौगुले यांना सध्या महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेतेपदावर काम करण्याची संधी संघटनेने दिली आहे. महापालिका निवडणूकीत विठ्ठल मोरे पराभूत झाल्याने व त्यांच्या वयाचा विचार करता तुलनेने तरूण व्यक्तिला जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती होण्याची शक्यता शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. विजय चौगुले व नामदेव भगत ही शिवसेनेच्या छावणीतील दोनच नावे आजमितीला पालिका सभागृहात व पालिका प्रशासनात चर्चिली जात आहे. विजय चौगुले किमान विरोधी पक्षनेते तरी आहेत. परंतु नामदेव भगत हे नगरसेवक असतानाही महापालिका प्रशासनाकडे नवी मुंबई कार्यक्षेत्रातील सर्वच समस्यांचा पाठपुरावा करत आहे. नामदेव भगत हे शिवसेनेत आल्यावर सिडको संचालक, जिल्हाप्रमुख, विरोधी पक्षनेते अशा पदावर दावा करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. तथापि कोणत्याही पदावर दावा न करता दिघा ते बेलापुर कार्यक्षेत्रातील शिवसैनिकांशी, शिवसेना पदाधिकार्यांशी संपर्क साधून संघटनावाढीसाठी प्रयास करत आहे. विविध नागरी समस्या निवारणासाठी महापालिका प्रशासनाच्या विविध विभागांकडे ते पाठपुरावा करत आहेत. खाडी शुध्दीकरण, अपघातमुक्त पामबीच, खाडीअर्ंतगत देवस्थानाचे सुशोभीकरण, बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटचे काम, अण्णासाहेब पाटील यांच्या स्मारक उभारणीची मागणी यासह अन्य शेकडो प्रकरणांवर नामदेव भगत यांनी शिवसैनिक म्हणून प्रशासनाकडे तसेच मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. नामदेव भगत हे राजकीय, सामाजिक वर्तुळात गेली २८ वर्षे कार्यरत असून कोकण, पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी काम केले आहे. दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविली आहे. जिल्हाप्रमुख ते प्रदेश सरचिटणिस कामाचा दांडगा अनुभव आहे. ऍड. मनोहर गायखे प्रारंभापासूनच शिवसेनेत कार्यरत असून विविध सेलवर त्यांनी काम केले आहे. लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद आदी निवडणूका आल्यावर ऍड. गायखेंच्या नावाची प्राधान्याने चर्चा होते. जिल्हाप्रमुखांविना सध्या नवी मुंबई शिवसेनेचा कारभार चालू असून शिवसेना गटातटात विखुरली आहे. नवी मुंबई शिवसेनेत स्पष्टपणे गटबाजी पहावयास मिळते. नवी मुंबई शिवसेनेत व सभागृहातही विजय चौगुले गटाचा प्रभाव स्पष्टपणे पहावयास मिळत आहे. शिवसेना प्रभावहिन असतान संघटनेला नावलौकीक मिळवून देण्याचे व शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे प्रामुख्याने काम विजय चौगुले यांनीच केले होते, हे नाकारता येणार आहे. विजय चौगुले यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. त्यामुळे सध्या ऍड. मनोहर गायखे आणि नामदेव भगत या दोन नावापैकीच कोणा एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नवी मुंबईतील शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईची शिवसेना गेल्या काही महिन्यापासून जिल्हाप्रमुखाविना वाटचाल करत आहे. राज्यात व केंद्रात सत्तेत भागीदार असणार्या व नवी मुंबईत विरोधी पक्षनेतेपद भूषविणार्या नवी मुंबई शिवसेनेला र्निनायकी अवस्थेत ठेवणे संघटनात्मक विचार करता शिवसेनेला हितावह नाही. लवकरात लवकर जिल्हाप्रमुख नियुक्त करून हा घोळ संपुष्ठात आणावा अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.
– संदीप खांडगेपाटील