शिमला : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या शिमल्यातील होली लॉज आणि नवी दिल्ली येथील निवासस्थानी तसेच कार्यालय अशा एकून ११ ठिकाणी सीबीआय व ईडीच्या अधिकार्यांनी शनिवारी सकाळी छापा मारला.
मुख्यमंत्र्यांविरोधात बेकायदेशीर संपत्ती आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) चौकशी चालू आहे.
त्यासंदर्भात हा संयुक्त छापा टाकण्यात आल्याचे समजते. या पथकाने घर आणि कार्यालयातून काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. वीरभद्र सिंग यांच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशीच त्यांच्या घर आणि कार्यालयांवर एकाच वेळी छापा मारण्यात आला. यावेळी वीरभद्र सिंग हे त्यांची मुलगी मीनाक्षी हिच्या लग्नात व्यस्त होते. शिमल्यातील संकट मोचन मंदिरात फरीदकोट येथील रविइंद्र आणि मीनाक्षी यांचा विवाह समारंभ सुरु असतानाच सकाळी नऊच्या सुमारास त्यांना छापे मारल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सपत्निक मुलीचे कन्यादान करुन दहाच्या सुमारास हॉलीलॉज येथे पोहचले.
मुलीच्या लग्नासाठी त्यांनी मंदिरात मोजक्याच १० १५ घरातील नातेवाईकांना आमंत्रित केले होते. तर काही विशेष निमंत्रितांना घरी बोलवले होते. मात्र त्यांच्या घरी छापे मारल्याने व संपूर्ण घर सील केले असल्याने अन्य कोणालाही आत येण्यास पोलिसांनी मनाई केल्याने पाहुण्यांना तसेच माघारी फिरावे लागले.