मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने ७२ विसर्जन स्थळे आणि २७ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विविध सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
मुख्य चौपाट्यांवर भुसभुशीत वाळूत वाहने अडकू नयेत, यासाठी किनार्यांवर २००हून अधिक लोखंडी प्लेट बसवण्यात आल्या आहेत. जर्मन तराफ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. जीवरक्षकांसह एकूण ६ जर्मन तराफे, ६ बोटींची व्यवस्था गिरगाव चौपाटीवर करण्यात आली आहे. अशीच व्यवस्था शिवाजी पार्क, दादर, आक्सा, जुहू, मढ-मार्वे, गोराईसह अनेक चौपाट्यांवर करण्यात आली आहे.
निर्माल्य वाहून नेण्यासाठी विसर्जनस्थळावर कॉम्पॅक्टर, मिनी कॉम्पॅक्टर, डंपरची व्यवस्था करण्यात आली आहे. फ्लड लॅन्टर्न दिवे, सर्च लाईट शिवाय भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी फिरत्या शौचालयांची सुविधा पुरवण्यात आली आहे. प्रमुख चौपाट्यांवर भरतीच्यावेळी भाविकांना समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी जीवरक्षकांसह खासगी संस्थांच्या मदतीने जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. गिरगाव चौपाटीवर १ हजार ४५७ चतुर्थ श्रेणीतील कामगारांना तैनात करण्यात आले आहे.
विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, याकरता मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. संपूर्ण शहरात अनंत चतुर्दशीला सुमारे ४० हजार पोलिसांचा फौजफाटा आणि राज्य राखीव दलाच्या दहा तुकड्या, २५० महिला फोर्ससह पोलीस शिपायांना तैनात करण्यात आले आहे.
४६ अतिसंदेवनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ११५हून अधिक विसर्जनाच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या वेळी वाहतुकीला काही रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत तर काही ठिकाणी एक दिशा मार्ग, तेरा ठिकाणी अवजड वाहनांना बंदी घातली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी ऍण्टी युटिजिंग स्कॉडची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय गणेश मंडळाच्या परिसरात साध्या वेषातील पोलीससुद्धा करडी नजर ठेवणार आहेत. अतिरेक्यांचा संभाव्य धोका पाहता क्युआरटीच्या पथकांसह मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्षाच्या ५०० कर्मचार्यांना तैनात ठेवण्यात आले आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावरील मुख्य मार्गाची वाहतूक सुरू राहणार असली तरी देखील शनिवार व रविवारच्या मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ या वेळेत वांद्रे टर्मिनस (मुख्य) आणि यार्डात दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. रविवारी गौरीपूजन असताना मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने दुरुस्ती कामांसाठी मेगाब्लॉक घेतला होता.
अनंत चतुर्दशीनिमित्त शहारातील काही ४९ मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ६ असा वाहतुकीत बदल असेल.
दक्षिण मुंबई, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगर भागातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरातील ५५ मार्गावर एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. १८ मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. तर ९९ मार्गावर पार्किंगसाठी सक्त मनाई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे. यावेळी ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती देण्याचे आदेश मुंबई अपर पोलीस आयुक्त विठ्ठल जाधव (वाहतूक) यांनी दिले.