कल्याण : कल्याण नगरपरिषदेचे नगरसेवक ते अंदमान निकोबार राज्याचे राज्यपाल पद भुषवून आपल्या अभ्यासू व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवणारे भाजपचे ज्येष्ठ नेते रामभाऊ कापसे यांचे मंगळवारी पहाटे ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८२ वर्षी कल्याणमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शासकीय इतमात दुपारी आधारवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, खासदार कपील पाटील, भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आदी उपस्थित होते.
उत्तम संसदसपूट, संघटन कौशल्य, मनमिळाऊ आणि प्रामाणिक राजकारणी म्हणून ओळखले जाणारे माजी राज्यपाल व भाजपाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ कापसे यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. नगरसेवक ते राज्यपाल असा पल्ला गाठणारे राम कापसे यांचा जन्म १९३३ साली ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे झाला होते. १९५९ ते ९३ या काळात त्यांनी रुपारेल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून केले. त्यानंतर कापसे हे राजकारणात कमालीचे सक्रीय झाले. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपाची पाळेमुळे रुजवण्यात कापसे यांनी मोलाचे योगदान दिले होते. उत्तम संघटन कौशल्यासोबत मनमिळाऊ स्वभाव असल्याने राम कापसे हे नेहमीच जनतेशी थेट संपर्कात होते. कल्याण विधानसभा मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला होता. १९८९ ते ९६ या काळात ठाणे लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर त्यांनी राज्यसभेत खासदारकी देण्यात आली होती. डोंबिवली लोकल सुरु करण्यासाठी कापसे यांनी अथक प्रयत्न केले होते. २००४ ते २००६ मध्ये ते अंदमान – निकोबारचे नायब राज्यपालपदही त्यांनी भूषवले होते. अंदमान निकोबारला त्सुनामीतून सावरण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. कापसे यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यात भाजपाने एक ज्येष्ठ व अभ्यासू नेता गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.