नवी मुंबई / प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील 10 शहरांमध्ये नवी मुंबईची निवड झाली असून केंद्रीय पातळीवरील 100 शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. यापुढील टप्प्यात केंद्रीय स्तरावरील निवडीतही नवी मुंबईचा समावेश असावा यादृष्टीने सकारात्मक वाटचाल सुरू असून त्यामध्ये नागरिकांच्या सूचना व संकल्पनांचा समावेश असावा याकरीता महापौर सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या नागरिक विशेष बैठकीप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मौल्यवान सूचना केल्या. याप्रसंगी महापौर महोदयांसमवेत आमदार संदीप नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेता जयवंत सुतार, विरोधीपक्ष नेता विजय चौगुले, परिवहन समिती सभापती साबू डॅनिअल आणि इतर मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते.
चर्चासत्राच्या प्रारंभी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेने आधीपासूनच राबविलेल्या स्मार्ट सिटीसाठी पुरक प्रकल्प व कामांची माहिती दिली. पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मलनि:स्सारण व्यवस्थापन, रस्ते, उद्याने, तलाव, ग्रीन बिल्डींग गोल्ड मानांकीत मुख्यालय, सीसीटीव्ही कॅमेर्याद्वारेे सुरक्षित शहर अशा विविध उल्लेखनीय बाबींचा उल्लेख करत नवी मुंबईने आधीपासूनच स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु केली असल्याचे सांगितले. यामध्ये स्मार्ट सिटीसाठी अधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने यापुढील काळात गतीमान कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगत महापालिका आयुक्त यांनी या सुविधा पुरविताना नागरिकांना आवश्यक व अभिप्रेत असलेल्या सुविधांवर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. नवी मुंबईतील नागरिक आणि नागरिकांच्या अपेक्षा हा प्राधान्य घटक असून नागरिकांच्या उल्लेखनीय सूचनांचा अंतर्भाव स्मार्ट सिटी आराखड्यामध्ये करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
नागरिकांसाठी थेट सूचना करणे, सूचना पत्रकावर लिखीत सूचना करणे अशाप्रकारचे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले असून लवकरच mygov वेबसाईटवर Disscussion Forum सुरु होत असून त्याची लिंक नवी मुंबई महानगरपालिकेच्या ुुु www.nmmconline.com वेबसाईटवरही उपलब्ध करुन देण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने फेसबुक, व्हॉट्सअप सारखे लोकप्रिय सोशल मिडियाचे पर्यायही उपलब्ध केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नागरिकांच्या कल्पक संकल्पनांचा स्मार्ट सिटी निर्मितीत समावेश असावा याकरीता शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ पातळीवर निबंध, पोस्टर्स, चित्रकला अशा स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे. आजच्या प्रमाणे विविध स्तरांवर नागरिक सुसंवाद बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसर्या टप्प्यात देशातील 10 शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश असावा यासाठी आपण प्रयत्नशील असून सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहयोगाने आपण हे ध्येय साध्य करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापौर सुधाकर सोनवणे यांनी नागरिकांमध्ये स्मार्ट सिटी बाबत उत्सुकता असून नवी मुंबई महानगरपालिकेने निर्मितीच्या काळातील त्रुटी भरुन काढून भविष्याचा विचार करीत सुविधा प्रकल्प राबविले त्यामुळे नवी मुंबईचा समावेश स्मार्ट सिटीसाठी राज्यातील 10 शहरांमध्ये झाला असून यापुढील काळात स्मार्ट सिटीच्या दिशेने अधिक गतीमान कार्यवाही करु व त्यात लोकसहभागाला सर्वोच्च प्राधान्य राहील असे सांगितले.
आमदार संदीप नाईक यांनी सर्वसामान्य नागरिकाला काय वाटते याचा विचार आराखड्यात व्हायला हवा असे मत व्यक्त करुन विविध पातळ्यांवर व नागरिकांना सोयीच्या विविध माध्यमातून नागरिकांशी याबाबत सुसंवाद वाढवायला हवा असे सांगितले.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सुविधा विकासाबरोबरच याठिकाणी पर्यटन क्षेत्राचाही विकास होणार आहे हे लक्षात घेऊन विकास कामांवर भर द्यायला हवा असे सांगत आरोग्य, स्वच्छता, शिक्षण या गोष्टींना प्राधान्य द्यावे असे सांगितले.
स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के यांनी स्मार्ट सिटी हा नागरिक आणि प्रशासन यामधील सेतू असल्याचे सांगत प्रशासन व नागरिक यामधील संवाद वाढविण्याची गरच व्यक्त केली. कामकाजातील सुलभता, कामकाजावर नियंत्रणात्मक देखरेख, सोयीसुविधांची सहज उपलब्धता, नागरी अधिकाराबरोबरच कर्तव्याची जाणीव आणि सकारात्मक बदल अशी स्मार्ट शब्दाची फोड करीत त्यांनी स्मार्ट सिटीमधील नागरिक खुष असावेत हे उद्दीष्ट निश्चित करुन त्यादृष्टीने यापुढील वाटचाल करायला हवी असे सांगितले.
विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी 111 प्रभागांतून काही प्रभागांची निवड करुन त्यांचा स्मार्ट सिटी स्वरुपात प्रायोगिक रितीने विकास करण्यात यावा असे सूचित करीत सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केल्यास नवी मुंबई केंद्रीय पातळीवरही स्मार्ट सिटीमध्ये नक्की स्थान मिळवेल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी स्वच्छ नवी मुंबई मिशनच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे व स्वच्छ महाराष्ट्र अभियान उप आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर यांनी महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेबाबत तसेच हागणदारीमुक्त नवी मुंबईसाठी करण्यात येणार्या कार्यवाहीची सादरीकरणाव्दारे माहिती दिली. महापौर सुधाकर सोनवणे यांचेसमवेत उपस्थितांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.
याठिकाणी आरोग्य विभागामार्फत मलेरीया / डेंग्यू आजार नियंत्रणासाठी घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययोजना याविषयीचा माहितीप्रद स्टॉल लावण्यात आला होता.
नागरिकांच्या उल्लेखनीय सूचना व संकल्पनांचा स्मार्ट सिटी आराखड्यात समावेश करण्याकरीता आयोजित या नागरिक चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 1000 हून अधिक नागरिक विष्णुदास भावे नाट्यगृहात उपस्थित होते. 40 हून अधिक नागरिकांनी यावेळी प्रत्यक्ष सूचना केल्या, तसेच 500 हून अधिक नागरिकांच्या लिखीत सूचना प्राप्त झाल्या. अनेक नागरिक लिखीत सूचना भरून महानगरपालिकेकडे पाठविणार आहेत.
नागरिकांकडून प्राप्त उल्लेखनीय सूचनांचा विचार स्मार्ट सिटी आराखडा तयार करताना केला जाईल असे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी विविध वृत्तपत्र, वृत्तचित्रवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले. यामध्ये प्रवासी वाहतुक सेवेचे सक्षमीकरण व वाहतुकीची वेळ याकडे विशेष लक्ष पुरविणे, शहरातील वाढती वाहन संख्या लक्षात घेऊन पार्किंग समस्येवर विविध प्रकारच्या उपाययोजना प्राधान्याने करणे, ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्या सुरक्षेवर भर देण्याकरीता मुख्य रस्त्यांप्रमाणेच शहराच्या आतील भागातही सीसीटीव्हीचे जाळे विकसित करुन शहर सुरक्षिततेवर अधिक भर देणे अशा विविध गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल असे त्यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांना जाणविणार्या समस्या सोडविण्याला विशेष प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट करीत महापालिका आयुक्तांनी यापुढील काळात विविध पातळ्यांवर नागरिकांच्या सूचना – संकल्पना जाणून घेतल्या जातील व याकरीता अशाच प्रकारची चर्चासत्रे विविध स्तरांवर आयोजित करण्यात येतील तसेच नागरिकांना सोशल मिडीया व इतर माध्यमे उपलब्ध करुन देण्यात येतील असे सांगितले.
नवी मुंबईकर नागरिकांनी या चर्चासत्राप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहराबद्दलचे आपले प्रेम व आपुलकी स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना सूचना, संकल्पनांच्या माध्यमातून व्यक्त केल्याबद्दल महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले.