पनवेलः मध्य रेल्वे तर्फे येत्या १ ऑक्टोबर २०१५ पासून पनवेल ते दिवा मार्गावर शटल रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहे. पनवेल-दिवा शटल रेल्वे सेवेसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता. मध्ये रेल्वे तर्फे पनवेल-दिवा शटल सेवा सुरु झाल्यानंतर या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.
मध्य रेल्वे तर्फे पनवेल ते दिवा या मार्गावर प्रायोगिक तत्वावर शटल रेल्वे सेवा १ ऑक्टोबर २०१५ पासून सुरु होणार आहे. साधारणतः रात्री ८ वाजता दिवा येथून निघणारी शटल रेल्वे रात्री ९ वाजता पनवेल रेल्वे स्थानकात पोहोचणार आहे. पनवेलहून रात्री ९.१० वाजता निघणारी शटल रेल्वे दिवा येथे रात्री १०.१० वाजता पोहोचणार आहे.
पनवेल ते दिवा या मार्गावर शटल रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत होती. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी ‘मध्ये रेल्वे’चे महाप्रबंधक एस. के. सुद यांच्याकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता. आ. प्रशांत ठाकूर यांनी पनवेल-दिवा शटल रेल्वे सुरु होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. ‘मध्य रेल्वे’चे महाप्रबंधक एस. के. सुद यांनी २८ सप्टेंबर रोजी आ. प्रशांत ठाकूर यांना पत्र पाठवून पनवेल ते दिवा या मार्गावर १ ऑक्टोबर २०१५ पासून शटल रेल्वे सेवा सुरु करण्यात येत असल्याचे कळविले आहे. ‘मध्य रेल्वे’च्या पनवेल-दिवा शटल रेल्वे सुरु करण्याच्या घोषणेचे रेल्वे प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे.