नवी मुंबई : नवी मुंबईने आवश्यक ते सर्व निकष पूर्ण केल्यानेच स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत देशातील अनेक शहरांमध्ये या शहराची निवड झाली आहे. स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रथम पालिकेच्या अधिकार्यांनी स्मार्ट बनायला हवे, असे आग्रही मत महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून ओळखले जाणार्या आमदार संदीप नाईक यांनी मांडले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत राज्यातील १० शहरांमध्ये नवी मुंबई शहराची निवड करण्यात आली आहे. यापुढे केंद्रीय स्तरावरही नवी मुंबईचा समावेश व्हावा, यासाठी पालिकेमार्फत स्मार्ट सिटी आराखडा तयार केला जातो आहे. या आराखडयामध्ये नागरिकांच्या सुचनांचा समावेश व्हावा यासाठी लोकसहभागातून विकास या सुत्राअंतर्गत पालिकेच्या वतीने वाशी येथील विष्णूदास भावे नाटयगृहात मंगळवारी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांच्या एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संदीप नाईक, पालिका आयुक्त दिनेश वाघमारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अनंत सुतार आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आमदार संदीप नाईक यांनी आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनात स्मार्ट सिटी विषयी आपले विचार मांडले. ग्रामपंचायतमधून पालिकेत वर्ग झालेले शहर म्हणजे नवी मुंबई होय. कोणत्याही शहराचा विकास हा टप्प्याटप्प्याने होत असतो. नवी मुंबईचा विकास गेल्या २० वर्षांमध्ये झाला आहे. देशात नवी मुंबईची निवड स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत झाल्याचा अभिमान असल्याचे आमदार नाईक म्हणाले.
स्मार्ट सिटीबाबत सुचना करण्यासाठी शहरातील शेवटच्या घटकालादेखील संधी मिळाली पाहिजे, असे सांगून जे नागरिक याविषयी पालिकेपर्यत मते मांडण्यासाठी पोहोचू शकत नाहित त्या नागरिकांपर्यत पालिकेने पोहचावे, असे ते म्हणाले. स्मार्ट सिटीबाबत सुचना मांडण्याचे स्वरुप काय असावे, याविषयी पालिकेने नागरिकांना मार्गदर्शन करावे,असे नमूद केले. स्मार्ट सिटीअंतर्गत राबविण्यात येणार्या प्रकल्पांचा नागरिकांना लाभ व्हायला हवा, असेही ते म्हणाले.
======= विरोधकांकडून भाषणाचे कौतुक…
आमदार संदीप नाईक यांच्या अभ्यासूपर्ण आणि मुद्देसूद भाषणाचे कौतुक बैठकीत उपस्थित नागरिकांनी तसेच विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी देखील केले. स्मार्ट सिटीसाठी पालिकेच्या अधिकार्यांनी अगोदर स्मार्ट व्हायला हवे, या त्यांच्या सुचनेचा पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.