मुंबई : मुंबईत उपनगरीय लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणात दोषी ठरलेल्या बारा आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने बुधवारी शिक्षा सुनावली.
बारापैकी पाच दोषींना फाशीची शिक्षा तर, सात दोषींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकारी पक्षाने आठ आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने लोकलमध्ये बॉम्ब ठेवणा-या पाच दोषींना फाशी सुनावली.
११ जुलैच्या संध्याकाळी उपनगरीय लोकलमध्ये ६.२४ ते ६.३५ या अवघ्या ११ मिनिटात एकापाठोपाठ एक सात बॉम्बस्फोट झाले होते. या भीषण बॉम्बस्फोटांमध्ये १८८ निष्पाप जीवांना बळी गेला तर, आठशेहून अधिक जखमी झाले.
हे सर्व बॉम्बस्फोट फर्स्टक्लासच्या डब्ब्यांमध्ये झाले होते. कमल अन्सारी, तनवीर अन्सारी, फैसल शेख, एतशाम सिद्दीकी, महम्मद अली शेख, साजिद अन्सारी, नावीद खान आणि असीफ बाशीर या आठ दोषींना मृत्यूदंड सुनावण्याची सरकारी वकिलांनी मागणी केली होती.
दोषी ठरलेले गुन्हेगार भविष्यात सुधारण्याची अजिबात शक्यता नाही. आपण केलेल्या कृत्याबद्दल त्यांच्या मनात कुठलीही पश्चातापाची भावना नाही असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वकिलांनी केला होता.
*** फाशीची शिक्षा झालेले दोषी
कमल अन्सारी, फैसल शेख, एतशाम सिद्दीकी, नावीद खान आणि असिफ खान
** जन्मठेप झालेले दोषी
माजीद महम्मद शफी, मुझम्मील शेख, सुहैल शेख ,जमीर शेख, तनवीर अन्सारी, साजिद अन्सारी.